साईमत -जळगाव- प्रतिनिधी |
‘स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफ टॉप’ (स्मार्ट) योजनेअंतर्गत दारिद्र्यरेषेखालील व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील ग्राहकांना अत्यल्प खर्चात छतावर १ किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा संच बसवून २५ वर्षे मोफत वीज मिळवण्याची नामी संधी उपलब्ध झाली आहे. या योजनेचा पात्र ग्राहकांनी लाभ घेऊन स्वातंत्र्यदिनानिमित्त वीजबिलमुक्तीचा संकल्प करावा, असे आवाहन महावितरणच्या जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी यांनी केले आहे.
केंद्र शासनाची ‘प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना’ आणि राज्य शासनाचे अतिरिक्त अनुदान यामुळे लाभार्थ्यांना अगदी नाममात्र हिस्सा भरून हा प्रकल्प बसवता येणार आहे. दरमहा १०० युनिटपेक्षा कमी वीज वापरणाऱ्या ग्राहकांना वीजबिलातून कायमची मुक्ती देणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे.
योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान व ग्राहकांचा हिस्सा
१ किलोवॅटच्या सौर प्रकल्पातून दरमहा सुमारे १२० युनिट वीज तयार होते. या प्रकल्पासाठी केंद्र व राज्य सरकारकडून भरघोस अनुदान दिले जात असून लाभार्थ्यांचा वर्गनिहाय हिस्सा खालीलप्रमाणे आहे:
लाभार्थी वर्गकेंद्र सरकार अनुदानराज्य सरकार अनुदानग्राहकांचा प्रत्यक्ष हिस्सा
दारिद्र्यरेषेखालील (BPL) ग्राहक₹३०,०००₹१७,५००केवळ ₹२,५००
अनुसूचित जाती / जमाती (SC/ST)₹३०,०००₹१५,०००केवळ ₹५,०००
सर्वसाधारण वर्ग (१०० युनिटपेक्षा कमी वापर)₹३०,०००₹१०,०००केवळ ₹१०,०००
योजनेची पात्रता व महत्त्वाच्या अटी
पात्रता: सप्टेंबर २०२४ ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत ज्या घरगुती ग्राहकांचा मासिक वीजवापर १०० युनिटपेक्षा कमी होता, ते ग्राहक या योजनेसाठी पात्र आहेत.
तत्त्व: ही योजना ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर राबवली जात आहे.
मुदत: या योजनेचा लाभ घेण्याची अंतिम मुदत मार्च २०२६ पर्यंतच मर्यादित आहे.
अर्ज कसा करावा?
पात्र ग्राहकांशी महावितरणतर्फे संपर्क साधला जात आहे. तरीही इच्छुकांनी स्वयंस्फूर्तीने महावितरणच्या www.mahadiscom.in किंवा केंद्र सरकारच्या https://pmsuryaghar.gov.in या पोर्टलवर अर्ज करावा.
ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी जवळच्या महावितरण शाखा अथवा उपविभाग कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
