पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या पुलावर वाहनांच्या लांबच लांब रांगा; वाहनचालक तासनतास अडकले
साईमत /बदलापूर/ प्रतिनिधी :
शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या प्रमुख उड्डाणपुलावर गुरुवारी प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याने बदलापूरकरांची अक्षरशः दमछाक झाली. पश्चिमेकडील दत्त चौकापासून पूर्वेकडील आदर्श शाळा चौकापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. परिणामी पूर्व-पश्चिम वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. अवघे काही मीटरचे अंतर पार करण्यासाठी वाहनचालकांना तासनतास कोंडीत अडकून पडावे लागल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
बदलापूर शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागात दैनंदिन ये-जा करण्यासाठी हा उड्डाणपूल अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र, पावसाळ्यात पुलावर वारंवार खड्डे पडत असल्याने वाहतुकीचा वेग मंदावतो आणि त्याचा थेट परिणाम वाहतूक व्यवस्थेवर होत आहे. गेल्या काही दिवसांपासून पुलावर सातत्याने कोंडी होत असल्याने वाहनचालकांसह नागरिक, विद्यार्थी आणि नोकरदार वर्गाला मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
दुपारच्या सुमारास शाळा सुटण्याच्या वेळेत परिस्थिती अधिकच गंभीर होत असल्याचे चित्र आहे. बुधवारीही शाळेत जाणाऱ्या तसेच शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घरी घेऊन जाणाऱ्या बस वाहतूक कोंडीत अडकल्या होत्या. रस्ता मोकळा नसल्याने रुग्णवाहिकांनाही कोंडीचा सामना करावा लागल्याचे दिसून आले. त्यामुळे आपत्कालीन सेवांवरही वाहतूक कोंडीचा परिणाम होत असल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.
उड्डाणपुलावरील कोंडी टाळण्यासाठी अनेक वाहनचालकांनी पूर्व-पश्चिम प्रवासासाठी पर्यायी असलेल्या बेलवली भुयारी मार्गाचा वापर करण्यास सुरुवात केली. मात्र, मोठ्या प्रमाणात वाहने या मार्गावर वळल्याने तेथेही वाहतूक कोंडी निर्माण झाली. त्यामुळे उड्डाणपुलावरून गेल्यास कोंडी आणि पर्यायी मार्गाचा वापर केल्यासही कोंडी, अशी दुहेरी कोंडीची स्थिती बदलापूरकरांसमोर निर्माण झाली आहे.
उड्डाणपुलावरील खड्डे तसेच अरुंद पुलावर एखादे वाहन बंद पडल्यास वाहतुकीचा संपूर्ण खोळंबा होणे ही कोंडीमागील प्रमुख कारणे ठरत आहेत. वाहनांचा वेग मंदावत असल्याने काही मीटरचे अंतर पार करण्यासाठीही मोठा कालावधी लागत आहे. परिणामी नागरिकांचा कामाचा वेळ वाया जात असून, दररोजच्या प्रवासाचा त्रासही वाढला आहे.
पावसाळ्यात खड्ड्यांची समस्या अधिक गंभीर होत असतानाही त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. उड्डाणपुलावरील खड्डे तातडीने बुजवावेत, वाहतुकीचे योग्य नियोजन करावे आणि वारंवार होणाऱ्या कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी बदलापूरकरांकडून होत आहे.
