बेवारस वाहनांवर ठाणे महापालिकेचा हातोडा;४५ ते ९० दिवसांत दावा नाही तर ई-लिलावातून भंगारात विक्री
साईमत /ठाणे / प्रतिनिधी :
शहरातील रस्ते, पदपथ, सार्वजनिक वाहनतळ आणि मोकळ्या जागांवर वर्षानुवर्षे धूळ खात पडून असलेल्या बेवारस वाहनांवर ठाणे महापालिकेने कारवाईचा निर्णय घेतला आहे. या वाहनांचा शोध घेऊन त्यांची नोंदणी करणे, सुरक्षित ठिकाणी हलविणे आणि ठरावीक मुदतीत संबंधित मालकाने दावा न केल्यास कायदेशीर प्रक्रियेद्वारे त्यांची भंगार म्हणून विक्री करण्याचे धोरण महापालिकेने आखले आहे. यासोबतच सार्वजनिक ठिकाणी पडून असलेले धातूचे भंगार आणि अनधिकृत साहित्यही हटविण्यात येणार आहे.
या मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी खासगी संस्थेची नियुक्ती करण्यात येणार असून, त्यासंदर्भातील प्रस्ताव १७ ऑगस्ट रोजी होणाऱ्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मान्यतेसाठी सादर केला जाणार आहे. त्यामुळे या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर शहरातील बेवारस वाहने हटविण्याच्या कारवाईला वेग येण्याची शक्यता आहे.
ठाणे शहरातील अनेक भागांत रस्त्यांच्या कडेला, पदपथांवर, सार्वजनिक वाहनतळांमध्ये तसेच महापालिकेच्या मोकळ्या जागांमध्ये मोठ्या संख्येने बेवारस वाहने पडून आहेत. काही वाहने अनेक महिन्यांपासून तर काही वाहने वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी उभी असल्याने सार्वजनिक जागांचा वापर कमी होत आहे. या वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याबरोबरच पादचाऱ्यांनाही पदपथावरून मार्गक्रमण करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
बेवारस वाहनांचा प्रश्न केवळ वाहतूक आणि अतिक्रमणापुरता मर्यादित नसून त्यातून आरोग्य व सुरक्षेचे प्रश्नही निर्माण होत आहेत. वाहनांमध्ये पावसाचे पाणी व कचरा साचल्याने डास आणि विविध कीटकांची पैदास होण्याची शक्यता असते. गंजलेली वाहने, फुटलेल्या काचा, खराब झालेले टायर तसेच इंधन अथवा वंगणाची गळती यामुळे आग लागण्याचा धोकाही निर्माण होऊ शकतो. विशेषतः आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची वाहने आणि इतर अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना मार्ग मोकळा मिळणे गरजेचे असल्याने बेवारस वाहने हटविणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महापालिका क्षेत्रातील रस्ते, पदपथ, सार्वजनिक वाहनतळ, मोकळ्या जागा आणि अन्य सार्वजनिक ठिकाणी बेवारस वाहने व भंगार साहित्याचा शोध घेण्यासाठी नियुक्त खासगी संस्थेमार्फत सर्वेक्षण करण्यात येणार आहे. जीपीएस यंत्रणा, भ्रमणध्वनीवरील ॲप तसेच प्रत्यक्ष पाहणीच्या माध्यमातून प्रत्येक वाहनाची नोंद केली जाणार आहे. त्यानंतर वाहतूक पोलीस आणि स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने संबंधित वाहने सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येतील.
ताब्यात घेतलेल्या वाहनांची माहिती तपासून त्याच्या मालकाचा शोध घेण्याची प्रक्रिया केली जाणार आहे. जप्त केलेली वाहने आणि साहित्य ठरावीक कालावधीसाठी सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात येणार असून, संबंधित मालकाने वाहनावर दावा केल्यास आवश्यक दंड व इतर शुल्क भरून ते परत घेण्याची संधी दिली जाणार आहे.
मात्र, निर्धारित कालावधीत कोणत्याही मालकाने दावा न केल्यास संबंधित वाहनांची कायदेशीर पद्धतीने विल्हेवाट लावली जाणार आहे. प्रस्तावानुसार साधारण ४५ ते ९० दिवसांच्या कालावधीनंतर मालकी हक्काचा दावा न झालेल्या वाहनांचा पारदर्शक ई-लिलाव किंवा ई-निविदा प्रक्रियेद्वारे भंगार म्हणून लिलाव करण्याचा पर्याय ठेवण्यात आला आहे.
महापालिकेच्या या मोहिमेमुळे शहरातील सार्वजनिक जागा मोकळ्या होण्याबरोबरच वाहतुकीतील अडथळे कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच बेवारस वाहनांमुळे निर्माण होणारे आरोग्य, स्वच्छता आणि सुरक्षेचे प्रश्नही दूर करण्यास हातभार लागणार आहे.
