रात्रभर पाऊस, पहाटे दरडीचा प्रहार;अरुंद गल्ल्यांमुळे यंत्रसामग्री पोहोचविण्यात अडथळा; हातानेच हटवला माती-दगडांचा ढिगारा
साईमत /मुंबई/ प्रतिनिधी :
मुंबईत रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे घाटकोपर-साकीनाका परिसरातील चिरागनगर येथे पहाटेच्या सुमारास भीषण दुर्घटना घडली. डोंगराचा मोठा कडा अचानक खचून गौसिया चाळीतील तीन घरांवर माती-दगडांचा प्रचंड ढिगारा कोसळला. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. ढिगाऱ्याखाली आणखी काही नागरिक अडकले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असल्याने बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
घाटकोपर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पहाटे तीन ते चारच्या सुमारास ही घटना घडली. रात्रभर पावसाचा जोर कायम असल्याने डोंगराचा काही भाग अचानक खचला आणि मोठ्या प्रमाणात माती, दगड खालील वस्तीत असलेल्या घरांवर येऊन कोसळले. नागरिक गाढ झोपेत असतानाच दुर्घटना घडल्याने त्यांना सावरण्याची किंवा घराबाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. काही क्षणांतच तीन घरे ढिगाऱ्याखाली गाडली गेली.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, मुंबई महापालिका तसेच अन्य बचाव पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. बचाव पथकांनी अथक प्रयत्न करून ढिगाऱ्याखालून सहा मृतदेह बाहेर काढले, तर चार जखमींना बाहेर काढून उपचारासाठी हलविण्यात आले. अद्याप काही नागरिक ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता असल्याने बचावकार्य थांबविण्यात आलेले नाही.
दरम्यान, चिरागनगर परिसरातील अरुंद गल्ल्यांमुळे मोठी यंत्रसामग्री घटनास्थळी नेण्यात अडथळे निर्माण झाले. त्यामुळे बचाव पथकांना माती आणि दगडांचा ढिगारा हातानेच हटवावा लागत आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत बचाव कर्मचारी काळजीपूर्वक ढिगारा हटवत असून, आत अडकलेल्या नागरिकांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
महापौर रितू तावडे यांनी घटनास्थळी पाहणी करून बचावकार्याचा आढावा घेतला. ढिगाऱ्याखाली आणखी नागरिक अडकले असण्याची शक्यता असून, त्यांना बाहेर काढण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणा समन्वयाने काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. परिसरातील इतर घरांनाही दरडीचा धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाकडून आवश्यक खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत.
दुर्घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी झाली. बचावकार्यात अडथळा निर्माण होऊ नये तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने घटनास्थळाचा परिसर बंदिस्त केला आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या दुर्घटनेमुळे चिरागनगर परिसरात शोककळा पसरली असून, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी बचाव पथकांची धडपड सुरू आहे.
