सकाळपासून रात्रीपर्यंत कोंडी; ठाकुर्लीकरांची वाहतूक कोंडीतून सुटका कधी?
साईमत /डोंबिवली / प्रतिनिधी :
डोंबिवलीतील स. वा. जोशी विद्यालयासमोरील ठाकुर्ली उड्डाण पुलाजवळ गेल्या पंधरा दिवसांपासून वाहतूक व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे. वाहतूक नियमनासाठी तैनात करण्यात आलेला वाहतूक सेवक या ठिकाणी नियमितपणे उपस्थित राहत नसल्याने वाहनचालकांना मनमानी पद्धतीने वाहने वळवावी लागत असून, परिणामी सकाळपासून रात्रीपर्यंत या परिसरात वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. या कोंडीचा सर्वाधिक फटका शाळकरी विद्यार्थी, पालक, रिक्षाचालक, नोकरदार आणि प्रवाशांना बसत आहे.
ठाकुर्ली उड्डाण पुलावर दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांसह शाळांच्या बसचालकांचीही मोठी गैरसोय होत आहे. सकाळच्या शाळेच्या वेळेत तसेच सायंकाळी कार्यालये सुटण्याच्या काळात परिस्थिती अधिक गंभीर होते. शाळांच्या बस, रिक्षा आणि खासगी वाहनांची मोठी संख्या या मार्गावर एकत्र येत असल्याने वाहतूक संथ होते. अनेकदा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून प्रवाशांना काही अंतर पार करण्यासाठीही बराच वेळ प्रतीक्षा करावी लागते.
काही महिन्यांपासून स. वा. जोशी विद्यालयाच्या बाजूला वाहतूक विभागाकडून एक वाहतूक सेवक नियमितपणे तैनात करण्यात आला होता. त्याच्या उपस्थितीमुळे उड्डाण पुलाजवळील वाहतूक नियंत्रित ठेवण्यास मदत होत होती. तसेच वाहनचालकांना पुलाजवळील गर्दीचा वळसा टाळून सारस्वत कॉलनी, गुरुमंदिर रस्ता, ठाकुर्ली आणि ९० फूट रस्त्याच्या दिशेने जाण्यास मार्गदर्शन केले जात होते. मात्र, गेल्या दोन आठवड्यांपासून या ठिकाणी वाहतूक पोलीस किंवा वाहतूक सेवक नियमितपणे दिसत नसल्याने वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे.
ठाकुर्ली रेल्वे फाटकाकडून उड्डाण पुलाच्या दिशेने येणारी वाहनेही याच ठिकाणी येऊन एकत्र होतात. उड्डाण पुलावरून येणाऱ्या वाहनांमुळे मार्गिका अडवल्या गेल्याने फाटकाकडून येणारी वाहने पुलाच्या प्रवेशद्वाराजवळच अडकून पडतात. परिणामी दोन्ही दिशेची वाहतूक एकमेकांत मिसळून कोंडी आणखी वाढते. वाहतूक नियमनासाठी कर्मचारी नसल्याने वाहनचालक उपलब्ध जागेतून वाहने पुढे काढण्याचा प्रयत्न करतात आणि परिस्थिती अधिकच बिकट होते.
डोंबिवलीहून कल्याणच्या दिशेने जाण्यासाठी ठाकुर्ली रेल्वे फाटकाकडील मार्ग तुलनेने कमी अंतराचा असल्याने काही ट्रक तसेच कचरा वाहतूक करणारी वाहनेही या अरुंद मार्गाचा वापर करतात. त्यातच परिसरातील शाळांच्या ५० हून अधिक बस या मार्गावरून ये-जा करतात. मोठ्या वाहनांची आणि शाळांच्या बसची संख्या वाढल्याने आधीच अरुंद असलेल्या मार्गावर वाहतुकीचा ताण वाढत आहे.
एकीकडे ठाकुर्ली उड्डाण पुलाजवळ वाहतूक कोंडी होत असताना कोपर उड्डाण पूल, टंडन रस्ता आणि चार रस्ता परिसरात एकाच ठिकाणी तीन ते चार वाहतूक पोलीस अथवा वाहतूक सेवक तैनात असल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे. मनुष्यबळाची उपलब्धता मर्यादित असल्यास सर्वाधिक वर्दळीच्या ठिकाणी त्याचा प्रभावी वापर करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
शेलार नाका, टिळक चौक आणि ठाकुर्ली उड्डाण पूल या ठिकाणी विशेषतः गर्दीच्या वेळेत वाहतूक कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी. तसेच शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेत विशेष वाहतूक नियोजन करावे, अशी मागणी वाहनचालक आणि पालकांकडून केली जात आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेली वाहतूक कोंडी तातडीने सोडवून वाहनचालक आणि विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
