जुहूगावात संतापजनक घटना; डोके जमिनीवर आपटून हत्या, आरोपीला अटक
साईमत न्यूज नेटवर्क –
नवी मुंबई : आई आपल्यापेक्षा मुलीची अधिक काळजी घेते, या कारणावरून झालेल्या वादातून संतप्त झालेल्या मुलाने जन्मदात्या आईची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना नवी मुंबईतील जुहूगाव परिसरात घडली. रागाच्या भरात आईला ढकलून दिल्यानंतर तिचे डोके जमिनीवर आपटून आरोपीने तिचा जीव घेतला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नवी मुंबई पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिलेचे नाव मंदा कदम असे आहे. घरात आई आपल्याकडे आणि सुनेकडे अपेक्षित लक्ष देत नसून मुलीकडेच अधिक लक्ष देते, अशी आरोपीची भावना होती. याच कारणावरून रविवारी रात्री आई आणि मुलामध्ये जोरदार वाद झाला.
वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपीने संतापाच्या भरात आईला ढकलून दिले. त्यानंतर तिचे डोके जमिनीवर आपटल्याने ती गंभीर जखमी झाली. या घटनेत तिचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.
या प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला १३ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. हत्येमागील नेमकी कारणे तसेच घटनेचा संपूर्ण तपास पोलिसांकडून सुरू आहे.
