मंदिर परिसरात मोठी गर्दी; आमदार, पत्रकार व पोलिसांच्या पुढाकाराने वाहतूक कोंडी सुरळीत
साईमत /मुक्ताईनगर / प्रतिनिधी
आषाढी वारीनंतर येणाऱ्या कामिका एकादशीला वारकरी संप्रदायात विशेष महत्त्व आहे. पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनानंतर संत मुक्ताईंचे दर्शन घेणे हे भाविकांसाठी श्रद्धेचे स्थान मानले जाते. त्यामुळे कामिका एकादशीच्या निमित्ताने विदर्भ, मराठवाडा, खान्देश तसेच मध्य प्रदेशातून हजारो वारकरी आणि भाविक पायी दिंड्यांसह मुक्ताईनगरीत दाखल झाले. रविवारी पहाटेपासूनच कोथळी येथील संत मुक्ताई मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. टाळ-मृदुंगाचा गजर, हरिनामाचा जयघोष आणि दिंड्यांच्या उपस्थितीने संपूर्ण तीर्थक्षेत्र भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेले होते.
कामिका एकादशीच्या निमित्ताने पहाटे पाच वाजल्यापासूनच भाविकांनी संत मुक्ताईंच्या दर्शनासाठी रांगा लावण्यास सुरुवात केली. जसजसा दिवस उजाडत गेला तसतशी भाविकांची संख्या वाढत गेली. विविध भागांतून आलेल्या वारकरी दिंड्यांमुळे मंदिर परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. लाखो भाविकांनी संत मुक्ताईंचे दर्शन घेतल्याची माहिती मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, पालखी सोहळा प्रमुख रवींद्र महाराज हरणे, उद्धव महाराज जुनारे, विनायकराव हरणे आणि ज्ञानेश्वर हरणे यांनी दिली.
दीड तास वाहतूक कोंडी
भाविकांची वाढती गर्दी आणि वाहनांची संख्या यामुळे मुक्ताई मंदिर परिसरातील वाहतुकीवर मोठा ताण निर्माण झाला. रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी करण्यात आल्याने सुमारे दीड तास वाहतूक कोंडी झाली. दर्शनासाठी आलेले भाविक तसेच स्थानिक नागरिकांना या कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागला.
परिस्थिती अधिक गंभीर होण्यापूर्वी आमदार चंद्रकांत पाटील यांनी स्वतः पुढाकार घेतला. पत्रकार संदीप जोगी, राजेश चौधरी, निलेश मेढे, दिलीप पाटील शेमळदे तसेच पोलिसांनी रस्त्यावर उतरून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. अनावश्यकपणे रस्त्यावर उभी असलेली वाहने बाजूला करण्यात आली. सामूहिक प्रयत्नांमुळे सुमारे एका तासात वाहतूक सुरळीत झाली आणि भाविकांना दर्शनासाठी जाणे सुलभ झाले.
गर्दीच्या काळात मंदिर परिसरात स्वतंत्र वाहतूक नियोजन करण्याची गरज असल्याचे पत्रकारांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. कामिका एकादशीसारख्या मोठ्या धार्मिक सोहळ्यांच्या वेळी पोलिस बंदोबस्ताबरोबरच स्वतंत्र वाहतूक व्यवस्था, वाहनतळ आणि मार्गदर्शक फलकांची कायमस्वरूपी व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली.
दरम्यान, भाविकांच्या मोठ्या गर्दीचा फायदा घेत काही महिलांच्या मंगळसूत्र चोरीच्या घटनाही घडल्याची माहिती समोर आली. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी भाविकांनी अधिक दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले.
प्रवर्तन चौकात वाहनामुळे पुन्हा कोंडी
शहरातील प्रवर्तन चौकात रस्त्यावर एका चारचाकी वाहनामुळे वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली. एमएच ०४ जीयू ३१२७ क्रमांकाची इर्टिगा गाडी सुमारे तीन तास एकाच ठिकाणी उभी असल्याने नवीन मंदिराच्या दिशेने येणाऱ्या वाहनांची मोठी रांग लागली. परिणामी चौक परिसरात वाहतूक कोंडी झाली.
ही बाब लक्षात येताच पोलिस निरीक्षक आशिष आडसूळ यांनी घटनास्थळी उपस्थित राहून पोलिस कर्मचाऱ्यांच्या मदतीने वाहतूक सुरळीत केली. अडथळा ठरणाऱ्या वाहनाला टोचन करून पोलिस ठाण्यात नेण्यात आले. या कारवाईस मुक्ताईनगर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आसिफ बागवान, अर्जुन भोई तसेच नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
भाविकांसाठी चहा वाटप
कामिका एकादशीच्या निमित्ताने मुक्ताई मंदिर परिसरात येणाऱ्या वारकरी आणि भाविकांसाठी योगराज कन्स्ट्रक्शनचे संचालक विनोद सोनवणे आणि प्रमोद सोनवणे यांच्या वतीने चहाचे वाटप करण्यात आले. दिवसभर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना या उपक्रमाचा लाभ मिळाला.
कामिका एकादशीच्या निमित्ताने मुक्ताईनगरीत झालेल्या भाविकांच्या अभूतपूर्व गर्दीमुळे धार्मिक उत्साहाला उधाण आले असले, तरी भविष्यात अशा मोठ्या सोहळ्यांमध्ये वाहतूक कोंडी आणि गर्दीचे नियोजन करण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे नागरिकांनी सांगितले.
