सहा दिवसांपासून बेपत्ता तरुणाचा बंधाऱ्यात मृतदेह सापडला
साईमत /पारोळा/ प्रतिनिधी
सहा ऑगस्टपासून बेपत्ता असलेल्या ४० वर्षीय तरुणाचा मृतदेह भिलालीजवळील बोरी नदीपात्रातील बंधाऱ्याच्या पाण्यात शनिवारी सकाळी आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. सुनील अशोक चौधरी (रा. न्हावी गल्ली, पारोळा) असे मृत तरुणाचे नाव आहे. सुनील यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून या घटनेचा तपास पारोळा पोलीस करीत आहेत.
सुनील चौधरी हे वाहन चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. गुरुवारी (दि. ६) ते एका मित्रासोबत तालुक्यातील भिलाली येथे लोखंडी दरवाजाची वर्दी घेऊन गेले होते. मात्र, रात्री उशिरापर्यंत ते घरी परतले नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांचा परिसरात शोध घेतला. नातेवाइकांकडे तसेच परिचितांकडे चौकशी करूनही त्यांचा ठावठिकाणा लागला नाही.
दरम्यान, कुटुंबीयांनी सुनील यांच्यासोबत गेलेल्या मित्र नितीन पाटील याच्याकडे विचारपूस केली असता, सहा ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास आपण दोघे भिलालीजवळील बोरी नदीपात्रातील बंधाऱ्याजवळ पोहण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी सुनील पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याचे नितीनने सांगितले. त्यानंतर त्यांचा नदीपात्रात शोध घेण्यात येत होता.
शनिवारी सकाळी सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास बंधाऱ्याच्या पाण्यावर सुनील यांचा मृतदेह तरंगताना आढळून आला. नागरिकांच्या मदतीने मृतदेह पाण्यातून बाहेर काढून पारोळा येथील कुटीर रुग्णालयात नेण्यात आला. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून सुनील यांना मृत घोषित केले.
या घटनेबाबत किशोर चौधरी यांच्या खबरीवरून पारोळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, सुनील यांचा मृत्यू पाण्यात बुडून झाला की त्यामागे अन्य काही कारण आहे, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. घातपाताची शक्यता अथवा इतर कोणते कारण आहे का, याचा तपास पोलीस करीत असून तपासाअंतीच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
