उड्डाणपूल न झाल्यास ‘शिवसेना स्टाईल’ आंदोलनाचा इशारा
साईमत -जळगाव- प्रतिनिधी | जळगाव शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील अत्यंत गजबजलेल्या आणि अपघातप्रवण कालिंकामाता मंदिर चौकात तातडीने उड्डाणपूल उभारण्यात यावा, या मागणीसाठी शिवसेना जळगाव महानगर (शिंदे गट) वतीने ‘जनतेच्या सुरक्षिततेसाठी स्वाक्षरी मोहीम’ सुरू करण्यात आली आहे. या दोन दिवसीय मोहिमेला पहिल्याच दिवशी परिसरातील रहिवासी आणि वाहनधारकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
राष्ट्रीय महामार्गावर कालिंकामाता चौक हा ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. येथे वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे सातत्याने छोटे-मोठे अपघात होत असून अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या पार्श्वभूमीवर, ‘शिवसेना जळगाव महानगर’च्या वतीने समस्त शिवसैनिकांनी ८ आणि ९ ऑगस्ट २०२६ रोजी या भव्य स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन केले आहे.
प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
मोहिमेदरम्यान स्वाक्षरी करण्यासाठी आलेल्या संतापलेल्या नागरिकांनी प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर सवाल उपस्थित केले. “ज्या ठिकाणी सर्वाधिक अपघात होतात, ते चौक सोडून इतर अनावश्यक ठिकाणी उड्डाणपूल का उभारले जात आहेत? प्रशासन अद्याप किती लोकांचा बळी घेण्याची वाट पाहत आहे?” असा संतप्त सवाल नागरिकांनी केला आहे. हायवेवरील वाढते अपघात रोखण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षित भविष्यासाठी हा उड्डाणपूल अपरिहार्य आहे, अशी भावना येथे व्यक्त झाली.
शिवसेना स्टाईल आंदोलनाचा इशारा
स्वाक्षरी मोहीम ही केवळ सुरुवात आहे. या मोहिमेनंतर हजारो नागरिकांच्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन प्रशासनाला सादर केले जाईल. जनतेची ही रास्त मागणी मान्य करून तातडीने उड्डाणपुलाचे काम मंजूर झाले नाही, तर पुढील काळात ‘शिवसेना स्टाईल’ने तीव्र जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी भूषण भोळे, राहुल पाटील, प्रशांत कोळी, विशाल महाजन, शंतनु नारखेडे, महेश पाटील, तुषार चौधरी, निलेश पवार, गणेश चौधरी, राझिक पटेल यांसह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. या जनआंदोलनात सहभागी होऊन आपली स्वाक्षरी देऊन सुरक्षित भविष्यासाठी मोठे पाऊल टाकावे, असे आवाहन शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.
