पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेचा दिलासा; खरीप पीक कर्ज तातडीने देण्याचे आदेश
साईमत -जळगाव- प्रतिनिधी |
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील ३१ हजार ९०८ पात्र शेतकऱ्यांसाठी १८४.१६ कोटी रुपयांचा निधी संबंधित बँकांच्या पूल खात्यात जमा करण्यात आला आहे. ही रक्कम आता थेट लाभार्थ्यांच्या कर्जखात्यांवर वर्ग करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झाली असून, जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
शासनाने २ जून २०२६ च्या मंत्रिमंडळ बैठकीत या कर्जमुक्ती योजनेला मान्यता दिली होती. योजनेच्या अंमलबजावणीसाठी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व राष्ट्रीयीकृत बँकांनी जिल्ह्यातील एकूण ८७ हजार ८२६ कर्जखात्यांची माहिती पोर्टलवर अपलोड केली होती. त्यापैकी ६५ हजार ३४३ कर्जखाती पात्र ठरली असून २५ जुलै रोजी पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली. यातील ५० हजार ५१५ कर्जखात्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. पहिल्या टप्प्यात ३१ हजार ९०८ पात्र लाभार्थ्यांसाठी १८४.१६ कोटी रुपयांचा निधी मुंबईतील कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बँकांच्या पूल खात्यात वर्ग करण्यात आला.
खरीप पीक कर्जाचे निर्देश आणि ‘अॅग्रीस्टॅक’साठी कॅम्प
कर्जमुक्तीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना तातडीने नवीन खरीप पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचे स्पष्ट निर्देश शासनाने सर्व बँकांना दिले आहेत. तसेच पहिल्या यादीतील उर्वरित पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण होताच त्यांच्या खात्यावरही रक्कम जमा केली जाणार आहे. दरम्यान, ज्या शेतकऱ्यांची ‘अॅग्रीस्टॅक’ नोंदणी बाकी आहे, त्यांच्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यात विशेष कॅम्प आयोजित केले जाणार आहेत. यासाठी १० ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीची बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती सहकार विभागाकडून देण्यात आली.
