शिव कॉलनीत रक्ताच्या थारोळ्यात आढळला तृतीयपंथीय;गंभीर जखमीवर जीएमसीत उपचार, गळ्याला ३० टाके पोलिसांकडून चौकशी
साईमत /जळगाव / प्रतिनिधी
दारूच्या नशेत एका तृतीयपंथीयाने दाढी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ब्लेडने स्वतःच्या गळ्यावर वार करून घेतल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (७ ऑगस्ट) दुपारी सुमारास शिव कॉलनी परिसरातील शंभर फुटी रस्त्यालगत घडली. या घटनेत ३० वर्षीय व्यक्ती गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमीच्या गळ्यावर तब्बल ३० टाके घालण्यात आल्याची माहिती आहे.
खंडेराव नगर परिसरातील इम्रान युसूफ पठाण (वय ३०) हे शुक्रवारी दुपारी शिव कॉलनीतील शंभर फुटी रस्त्यालगत असलेल्या मोकळ्या भूखंडात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांचे तृतीयपंथीय सहकारी त्या ठिकाणी पोहोचले असता त्यांना ही बाब निदर्शनास आली. त्यांनी विलंब न करता इम्रान यांना उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच रामानंदनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक मधुकर साळवे यांनी रुग्णालयात जाऊन घटनेची माहिती घेतली. मात्र, गंभीर जखमी असलेली व्यक्ती शुद्धीवर नसल्याने तिने स्वतःच्या गळ्यावर ब्लेडने वार का केले, याचे नेमके कारण समोर आलेले नाही.
घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याने पोलिसांनी या प्रकरणात तत्काळ गुन्हा दाखल केलेला नाही. जखमी व्यक्ती शुद्धीवर आल्यानंतर तिच्याकडून मिळणाऱ्या माहितीतून या घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू असून, जखमीच्या प्रकृतीकडेही लक्ष ठेवण्यात येत आहे.
