थकबाकी भरली नाही, चोरीचा मार्ग स्वीकारला; तिघांवर कायदेशीर कारवाई
साईमत /जळगाव/ प्रतिनिधी
थकबाकीपोटी स्मार्ट मीटरमधून वीजपुरवठा आपोआप खंडित (ऑटो डिस्कनेक्ट) झाल्यानंतरही अनधिकृतपणे वीज वापरणाऱ्या ग्राहकांवर महावितरणने कारवाईचा बडगा उगारला आहे. जळगाव शहरातील तीन ग्राहकांनी वीजबिलाचा भरणा न करता परस्पर वीज जोडणी करून चोरी केल्याचे तपासणीत आढळून आले असून, त्यांच्याविरोधात जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
महावितरणकडून स्मार्ट मीटर प्रणालीद्वारे थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा नियंत्रित केला जात आहे. मात्र काही ग्राहकांकडून वीजपुरवठा खंडित झाल्यानंतरही अनधिकृत मार्गाने वीज वापरण्याचे प्रकार समोर येत आहेत. अशाच प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महावितरणच्या पथकांकडून तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे.
शहरातील श्रीराम चौक परिसरातील प्रतिभा रितेश पवार या ग्राहकाचा वीजपुरवठा थकबाकीमुळे स्मार्ट मीटरमधून बंद करण्यात आला होता. मात्र त्यांनी थकीत वीजबिलाचा भरणा न करता घरासमोरील लघुदाब वीज वाहिनीवर आकडा टाकून अनधिकृतपणे वीज वापरल्याचे महावितरणच्या तपासणीत आढळून आले. या प्रकरणात सुमारे ९ हजार ७०० रुपयांची वीजचोरी झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
दुसऱ्या प्रकरणात आशाबाबा कॉलनी येथील लक्ष्मी भानुदास बागडे या ग्राहकानेही स्मार्ट मीटरद्वारे वीजपुरवठा खंडित असतानाही वीज वाहिनीवर आकडा टाकून अनधिकृत वीज वापर केला. या ग्राहकाकडून सुमारे ३४ हजार रुपयांची वीजचोरी झाल्याचे तपासणीत स्पष्ट झाले.
तर शिव कॉलनी परिसरातील स्वप्नील प्रशांत सैंदाणे यांच्याकडेही वीजबिलाची थकबाकी असल्याने वीजपुरवठा बंद करण्यात आला होता. मात्र त्यांनी नियम धाब्यावर बसवत अनधिकृतपणे वीज जोडणी करून वापर सुरू ठेवला. या प्रकरणात ३८ हजार ८५० रुपयांची वीजचोरी झाल्याचे महावितरणने सांगितले.
या तिन्ही प्रकरणांमध्ये महावितरणचे उपकार्यकारी अभियंता दिलीप मराठे यांच्या फिर्यादीवरून ७ ऑगस्ट रोजी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात भारतीय विद्युत कायद्यातील कलम १३५ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दरम्यान, थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांनी तातडीने वीजबिलांचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. वीजपुरवठा परस्पर जोडून वापरणाऱ्या ग्राहकांवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आली असून, अनधिकृत वीज जोडणी आढळल्यास कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
महावितरणने ग्राहकांना इशारा देताना सांगितले आहे की, अनधिकृतपणे वीज जोडणी करणे धोकादायक असून त्यातून प्राणघातक अपघात होण्याची शक्यता असते. तसेच वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांना शेजाऱ्यांनीही बेकायदेशीरपणे वीजपुरवठा देऊ नये. अशा प्रकारात संबंधितांवरही कारवाई करून वीजपुरवठा खंडित केला जाऊ शकतो.
