साईमत -जळगाव- प्रतिनिधी |
राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंह देओल यांनी दिनांक 7 रोजी शुक्रवार ला जळगाव जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि खासगी शाळांना भेट देऊन शैक्षणिक वातावरणाची प्रत्यक्ष पाहणी केली. विद्यार्थीकेंद्रित शिक्षण, मूलभूत सुविधांचा विस्तार आणि शैक्षणिक दर्जात सुधारणा करण्यावर त्यांनी या दौऱ्यादरम्यान विशेष भर दिला.
या पाहणी दौऱ्यात उपायुक्त तुषार महाजन, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर, माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण, प्राथमिक शिक्षणाधिकारी निलेश पाटील, उपशिक्षणाधिकारी नरेंद्र चौधरी आणि विजय सरोदे यांच्यासह शिक्षण विभागातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
यावल व पाळधी येथील शाळांना भेटी: प्रधान सचिवांनी यावल तालुक्यातील साकळी येथील जिल्हा परिषद उर्दू शाळा, मराठी शाळा, शारदा हायस्कूल, तसेच पाळधी येथील जिल्हा परिषद शाळा, कन्या शाळा आणि ए. टी. झांबरे विद्यालयाची पाहणी केली.
विद्यार्थ्यांशी थेट संवाद: वर्गखोल्या, डिजिटल सुविधा, स्वच्छता आणि शैक्षणिक साहित्याची पाहणी करतानाच त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या प्रगतीचा व आवडी-निवडींचा आढावा घेतला.
शिक्षकांना महत्त्वाच्या सूचना: विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, वाचन संस्कृती, नियमित उपस्थिती आणि क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांना चालना देण्यासाठी शिक्षकांनी समन्वयाने प्रयत्न करावेत, असे निर्देश त्यांनी दिले.
नवनवीन अभियानांवर भर: जिल्ह्यातील शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण मिळवून देण्यासाठी स्थानिक पातळीवर प्रभावी नियोजन करून नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याचे मार्गदर्शन त्यांनी केले.
दौऱ्याच्या शेवटी, शाळांमध्ये शिक्षकांकडून राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांचे प्रधान सचिवांनी कौतुक केले. तसेच, शिक्षण अधिक समृद्ध करण्यासाठी प्रशासन, शिक्षक आणि पालकांनी एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.
