विद्यार्थिनींना गुप्तपणे विकले जात होते ‘मिनी मोबाईल’शाळेबाहेरील संशयास्पद मोबाईल विक्रीवर दामिनी पथकाचा छापा
साईमत /जळगाव/ प्रतिनिधी :
शहरातील एका मुलींच्या शाळेबाहेर विद्यार्थिनींना गुप्तपणे लहान आकाराचे ‘मिनी मोबाईल’ विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार दामिनी पथकाच्या कारवाईत उघडकीस आला आहे. काही दिवस सिव्हिल ड्रेसमध्ये परिसरावर पाळत ठेवल्यानंतर महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. या वेळी काही विद्यार्थिनींकडून लहान आकाराचे मोबाईल जप्त करण्यात आले असून संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, शाळेबाहेर तात्पुरते स्टॉल लावून काही व्यक्ती विद्यार्थिनींना अत्यंत लहान आकाराचे मोबाईल विकत असल्याचे निदर्शनास आले होते. हे मोबाईल आकाराने इतके छोटे होते की, ते सहजपणे दप्तरात किंवा खिशात लपविता येत असल्याने पालक किंवा शिक्षकांच्या नजरेस पडत नव्हते. विशेष म्हणजे केवळ ९०० ते १००० रुपयांमध्ये हे मोबाईल विद्यार्थिनींना विकले जात असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
दामिनी पथकाने काही दिवस संबंधित परिसरात सिव्हिल ड्रेसमध्ये गुप्त पाळत ठेवली. त्यानंतर करण्यात आलेल्या कारवाईत काही विद्यार्थिनींकडून हे मिनी मोबाईल जप्त करण्यात आले. प्राथमिक चौकशीत संबंधित व्यक्ती विद्यार्थिनींना स्वतःच्या मोबाईलद्वारे अनोळखी व्यक्ती किंवा मुलांशी संपर्क करून देत असल्याची बाबही समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले असून पोलिसांकडून संबंधितांची ओळख व त्यांच्या नेटवर्कची माहिती घेण्याचे काम सुरू आहे.
घटनेची गंभीर दखल घेत दामिनी पथकाने शाळा प्रशासन आणि संबंधित विद्यार्थिनींच्या पालकांना तातडीने शाळेत बोलावून घेतले. पालकांच्या उपस्थितीत विद्यार्थिनींना त्यांच्या ताब्यात देण्यात आले. तसेच मोबाईलचा गैरवापर, अनोळखी व्यक्तींशी संपर्काचे धोके आणि सामाजिक माध्यमांवरील फसवणुकीपासून सावध राहण्याबाबत विद्यार्थिनींचे समुपदेशन करण्यात आले.
शालेय विद्यार्थिनींना अशा आमिषांपासून दूर ठेवण्यासाठी आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी दामिनी पथकाने केलेली ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे. यापुढेही शाळा परिसरात संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवून अशा प्रकारांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
