खड्ड्यांत साचले पाणी, राष्ट्रीय महामार्ग झाला धोकादायक; वाहनचालकांची जीवघेणी कसरत
साईमत /पहूर, ता. जामनेर / प्रतिनिधी :
जळगाव–छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावरील पहूरजवळील रखडलेल्या रस्त्याच्या कामामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रेल्वे उड्डाणपुलाच्या कामामुळे अनेक दिवसांपासून रखडलेल्या या मार्गाची करण्यात आलेली तात्पुरती दुरुस्ती पावसामुळे पुन्हा उखडली असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने ते वाहनचालकांच्या लक्षात येत नसून अपघाताचा धोका वाढला आहे.
रेल्वे मार्गावरील काम सुरू असल्याने या भागातील राष्ट्रीय महामार्गाची वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात रस्त्याची डागडुजी करण्यात आली होती. मात्र, पावसाच्या सततच्या माऱ्यामुळे ही दुरुस्ती टिकू शकलेली नाही. परिणामी रस्त्यावर ठिकठिकाणी खोल खड्डे निर्माण झाले असून पावसाचे पाणी साचल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही.
विशेषतः दुचाकीस्वार, रुग्णवाहिका, शालेय वाहने तसेच रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी हा मार्ग धोकादायक ठरत आहे. खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात वाहनचालकांना अचानक दिशा बदलावी लागत असल्याने समोरून येणाऱ्या वाहनांशी अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे वाहतूक कोंडी, वाहनांचे नुकसान आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या समस्येबाबत स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांनी अनेक वेळा संबंधित विभागाकडे तक्रारी करूनही अद्याप कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नसल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे. पावसाळ्यात परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता असून मोठ्या दुर्घटनेपूर्वी प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केवळ खड्डे बुजविण्याची औपचारिकता न करता मजबूत आणि दर्जेदार रस्त्याची तातडीने व्यवस्था करावी. तसेच रेल्वे उड्डाणपूल आणि महामार्गाचे रखडलेले काम युद्धपातळीवर पूर्ण करून प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी वाहनचालक, प्रवासी आणि परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे. संभाव्य अपघात टाळण्यासाठी संबंधित यंत्रणेने त्वरित कार्यवाही करणे आवश्यक असल्याचे नागरिकांनी सांगितले.
