माता-पिता, गुरु आणि संस्कृतीवर विद्यार्थ्यांचे चिंतन; २५० विद्यार्थ्यांचा निबंध स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग
साईमत /फैजपूर/ प्रतिनिधी :
खंडोबा देवस्थान येथे स्व. महंत ब्रह्मचारी घनश्यामदास महाराज यांच्या आठव्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित संगीतमय श्रीराम कथा महोत्सवाला भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या आध्यात्मिक वातावरणात विद्यार्थ्यांमध्ये लेखनाची आवड निर्माण व्हावी, भारतीय संस्कृती, संस्कार, आई-वडील व गुरु यांच्याविषयी आदराची भावना रुजावी या उद्देशाने आंतरशालेय आध्यात्मिक निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
श्रीराम कथा महोत्सवाच्या पावन पर्वावर महामंडलेश्वर पुरुषोत्तमदास महाराज यांच्या प्रेरणेने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी दोन गट तयार करण्यात आले होते. या स्पर्धेत विविध शाळांमधील तब्बल २५० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
‘माता-पिता’, ‘गुरु’, ‘संस्कृती’ आणि ‘संस्कार’ या विषयांवर विद्यार्थ्यांनी आपले विचार प्रभावीपणे मांडले. निबंध लेखनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी भारतीय परंपरा, कुटुंबव्यवस्था आणि जीवनमूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
यावेळी महामंडलेश्वर पुरुषोत्तमदास महाराज, महामंडलेश्वर पवनकुमारदास महाराज, रामचरणदासजी महाराज, डॉ. आर. आर. राजपूत, शुभम सैंदाणे यांच्यासह विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खंडोबा देवस्थान येथे सुरू असलेली संगीतमय श्रीराम कथा दररोज सायंकाळी सात ते रात्री दहा या वेळेत होत असून भरत महाराज म्हैसवाडीकर यांच्या मुखातून भाविकांना कथेचे श्रवण घडत आहे.
या धार्मिक सोहळ्याची सांगता दि. ६ रोजी सकाळी नऊ वाजता शिंदखेडा येथील योगिदत्तनाथ महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार आहे. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रीराम कथेचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
