दोन महिन्यांचा पगार मागणे पडले महागात; काठीच्या वाराने घेतला जीव ढाबा चालकाविरुद्ध खुनाचा गुन्हा
साईमत /मुक्ताईनगर/ प्रतिनिधी
थकीत वेतनाची मागणी केल्याने संतप्त झालेल्या ढाबा चालकाने वॉचमनवर काठीने प्राणघातक हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार मुक्ताईनगर-बऱ्हाणपूर महामार्गावरील उचंदा शिवारात उघडकीस आला आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या वॉचमनचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या प्रकरणी मृताच्या पत्नीच्या तक्रारीवरून ढाबा चालकाविरुद्ध मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.
गोकुळ तारासिंग जाधव (वय ५५) हे ‘शेर-ए-पंजाब’ या ढाब्यावर वॉचमन म्हणून कार्यरत होते. त्यांची पत्नी सुमित्राबाई जाधव या देखील त्याच ठिकाणी पोळ्या बनविण्याचे काम करीत होत्या. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून दोघांचाही पगार थकला होता. त्यामुळे गोकुळ जाधव वारंवार आपल्या मेहनताना मिळावा, यासाठी ढाबा चालकाकडे पाठपुरावा करीत होते.
फिर्यादीनुसार, १ ऑगस्टच्या मध्यरात्रीनंतर ढाब्यावर काम सुरू असताना पगाराच्या कारणावरून वाद निर्माण झाला. त्यावेळी ढाबा चालक कमलजितसिंग प्रितमसिंग याने गोकुळ जाधव यांच्या डोक्यात काठीने वार केल्याचे समोर आले आहे. हल्ल्यानंतर जाधव हे रस्त्यालगतच्या गॅरेज परिसरात रक्तबंबाळ अवस्थेत पडलेले आढळून आले. पत्नी सुमित्राबाई यांनी त्यांना तातडीने सुरक्षित ठिकाणी आणून उपचारासाठी हलविण्याची व्यवस्था केली.
प्राथमिक उपचारानंतर गोकुळ जाधव यांना भुसावळ येथे नेण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच २ ऑगस्ट रोजी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.
पतीच्या मृत्यूनंतर सुमित्राबाई जाधव यांनी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. थकीत पगार मागितल्याच्या कारणावरूनच पतीवर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचा आरोप त्यांनी तक्रारीत केला आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी कमलजितसिंग प्रितमसिंग याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमान्वये खुनाचा गुन्हा नोंदविला आहे.
दरम्यान, घटनेचा संपूर्ण घटनाक्रम, हल्ल्याचे नेमके कारण, तसेच आरोपीची भूमिका याबाबत मुक्ताईनगर पोलीस सखोल तपास करीत आहेत. तपास पूर्ण झाल्यानंतरच या प्रकरणातील सर्व बाबी स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
