जळगाव -प्रतिनिधी | शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; अग्निशमन दलाच्या शर्थीच्या प्रयत्नांनी संकट टळले
जळगाव महानगरपालिकेचे पाच ते सहा अग्निशमन बंब घटनांसाठी दाखल झाल्याने दुर्घटना कळली
घटनेबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद घेण्याचे काम सुरू
जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील बाबा नमकीन चिवडा या कंपनीत मंगळवारी सकाळी अचानक भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. कंपनीतून धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाळा उसळत असल्याचे लक्षात येताच तातडीने जळगाव महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले आणि आग विझविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू करण्यात आले.
सुरुवातीला दोन ते तीन अग्निशमन बंबांच्या मदतीने आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र आगीची तीव्रता लक्षात घेता आणखी अग्निशमन बंब पाचारण करण्यात आले. एकूण सहा ते सात अग्निशमन बंबांच्या मदतीने जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत अखेर आग पूर्णपणे आटोक्यात आणली. वेळेत आग नियंत्रणात आल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
प्राथमिक माहितीनुसार, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असून या घटनेत कंपनीचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. आग लागण्याचे नेमके कारण आणि नुकसानीचा अचूक आकडा याबाबत संबंधित यंत्रणेकडून तपास सुरू आहे.
या बचावकार्यात वाहनचालक युसूफ पटेल, मयूर ओतारी, शोएब तडवी तसेच फायरमन योगेश कोल्हे, राकेश सोनवणे, इक्बाल तडवी, राकेश पाटील, विक्की सोनवणे आणि सतार तडवी यांनी मोलाचे योगदान दिले. दरम्यान, या घटनेची नोंद एमआयडीसी पोलीस ठाण्यात घेण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे.
