सांडव्याजवळील खचलेल्या भिंतीमुळे चिंता; निंबादेवी धरणाच्या दुरुस्तीची मागणी
साईमत /यावल/ प्रतिनिधी
सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी वसलेले तसेच यावल तालुक्यातील भोनक नदीच्या उगमस्थानी असलेले निंबादेवी धरण यंदा पूर्ण क्षमतेने भरले असून परिसरातील नागरिकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनले आहे. धरण परिसरातील निसर्गरम्य वातावरण पाहण्यासाठी तालुक्यासह जिल्हाभरातून पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. मात्र, मागील काही वर्षांतील दुर्घटनांचा अनुभव लक्षात घेता धरण परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने कडक निर्बंध लागू करण्याची मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे.
पावसाळ्यात नदी, नाले, धरणे, पाझर तलाव तसेच जलसाठ्याच्या ठिकाणी जाणे टाळावे, अशा सूचना प्रशासनाकडून वारंवार देण्यात येत आहेत. मात्र, या सूचनांकडे दुर्लक्ष करून अनेक तरुण मंडळी मित्रमंडळींसह निंबादेवी धरणावर मौजमस्ती, फोटोसेशन आणि सेल्फी काढण्यासाठी मोठ्या संख्येने पोहोचत आहेत. त्यामुळे भविष्यात कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी प्रशासनाने वेळीच कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, निंबादेवी धरणाच्या सांडव्याजवळील पायऱ्यांच्या परिसरातील भिंतीचा काही भाग खचल्याचे दिसून येत असून त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या ठिकाणी पर्यटकांची गर्दी वाढल्यास धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परिसरातील नागरिकांनी याबाबत चिंता व्यक्त करत संबंधित विभागाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
लघु पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, हा प्रकार मागील वर्षातील असून धरण दुरुस्तीसाठी प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात आला आहे. लवकरच या प्रस्तावाला मंजुरी मिळून दुरुस्तीचे काम मार्गी लागेल, अशी माहिती देण्यात आली.
लघु पाटबंधारे विभागाच्या शाखा अभियंता वर्षा चव्हाण यांनी निंबादेवी धरणाची पाहणी केली. यावेळी त्यांनी धरणाला कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट केले. तसेच दुरुस्तीबाबतचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्यात आला असून लवकरच कार्यवाही होईल, असे त्यांनी सांगितले.
निंबादेवी धरणाची पाणीसाठा क्षमता २.४२८ दशलक्ष घनमीटर असून निर्मिती पाणीसाठाही तेवढाच आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील ३०६ हेक्टर शेतजमिनीला सिंचनाचा लाभ मिळत आहे. नायगाव, सावखेडा सिम, दहिगाव, शिरसाड, साकळी, नावरे आणि वडोदे या गावांतील शेतशिवारांना या धरणाचा मोठा फायदा होत आहे.
दरम्यान, धरणातून सांडव्याद्वारे वाहून जाणारे पाणी नागादेवी पाझर तलावाकडे वळविल्यास या तलावाचा जलसाठा वाढण्यास मदत होईल. त्यामुळे दहिगाव, सावखेडा सिम आणि मोहराळा परिसरातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होऊ शकतो. यासाठी प्रशासनाने याकडे लक्ष देऊन आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
मागील काही वर्षांमध्ये जलसाठ्याच्या ठिकाणी घडलेल्या दुर्घटनांचा विचार करता निंबादेवी धरणावर सुरक्षाव्यवस्था वाढविणे गरजेचे झाले आहे. केवळ मौजमस्ती, धोकादायक फोटोसेशन किंवा प्रसिद्धीसाठी जीव धोक्यात घालणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच धरण परिसरात आवश्यक ते निर्बंध लागू करावेत, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
