खड्ड्यांमुळे वाहनचालक त्रस्त रस्ता दुरुस्त करा, रखडलेली कामे पूर्ण करा परिसरातील नागरिकांचा प्रशासनावर रोष
साईमत /रावेर / प्रतिनिधी
रावेर आणि मुक्ताईनगर या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या रावेर–पुनखेडा–पातोंडी मार्गावरील नव्याने करण्यात आलेल्या डांबरीकरणाच्या कामाचा निकृष्ट दर्जा पावसाळ्यात उघडकीस आला आहे. नुकतेच पूर्ण झालेल्या रस्त्यावर अनेक ठिकाणी डांबर उखडून खडी बाहेर आली असून मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांसह नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. संबंधित ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणावर वाहनांची ये-जा होत असून शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी तसेच नोकरीसाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांना या खराब रस्त्यामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांना विशेषतः जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असून अपघाताची शक्यता वाढली आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने रस्त्याची पाहणी करून दोषी कामाची चौकशी करावी आणि दर्जेदार डांबरीकरण करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, गावातील अंतर्गत रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची कामेही अद्याप अपूर्ण अवस्थेत आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यांवर मोठे खड्डे पडले असून त्यामध्ये पावसाचे पाणी साचत आहे. पाण्याखाली खड्डे झाकले जात असल्याने वाहनचालकांना त्यांचा अंदाज येत नाही आणि अपघाताचा धोका अधिक वाढत आहे. याशिवाय रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांमधून उडणाऱ्या चिखल व पाण्यामुळे पादचारी आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून यावरून वादाचे प्रसंगही घडत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.
नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ घटनास्थळी पाहणी करून दुर्गादेवी मंदिरासमोरील अपूर्ण रस्त्याचे काम पूर्ण करावे, उखडलेल्या भागाचे नव्याने व दर्जेदार डांबरीकरण करावे तसेच गावातील रखडलेली काँक्रिटीकरणाची कामे युद्धपातळीवर पूर्ण करावीत, अशी मागणी केली आहे. पावसाळ्यात या मार्गाची झालेली दुरवस्था लक्षात घेता संबंधित यंत्रणेने तातडीने उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही काही नागरिकांनी दिला आहे.
