जीपीएस परिवाराकडून ६५० नागरिकांना मोफत चष्म्यांचे वाटप ‘ज्येष्ठांची सेवा हीच परमेश्वराची खरी सेवा’ पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन
साईमत /पाळधी (ता. धरणगाव) / प्रतिनिधी
ज्येष्ठ नागरिकांच्या डोळ्यांतील अंधुकपणा दूर करून त्यांच्या आयुष्यात पुन्हा प्रकाश आणि आत्मविश्वास निर्माण करण्याचे कार्य म्हणजेच खरी समाजसेवा आहे. ज्येष्ठांच्या चेहऱ्यावरील हास्य आणि डोळ्यांतील समाधान हेच जनसेवेचे सर्वात मोठे समाधान असल्याचे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले.
पाळधी येथील सुगोकी लॉन येथे जीपीएस परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मोफत चष्मा वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी धरणगाव व जळगाव तालुक्यातील नेत्रतपासणीत पात्र ठरलेल्या सुमारे ६५० ज्येष्ठ नागरिकांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, “ज्येष्ठांच्या डोळ्यांत पुन्हा प्रकाश फुलवणे म्हणजे त्यांच्या उर्वरित आयुष्याला आनंद, आत्मविश्वास आणि स्वाभिमानाची नवी दिशा देणे होय. समाजाने आपल्याला खूप काही दिले आहे. त्यामुळे आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो. जो दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्यासाठी जगतो, तोच खऱ्या अर्थाने जीवन जगतो. ज्येष्ठांची सेवा हीच परमेश्वराची खरी सेवा आहे.”
जळगाव ग्रामीण मतदारसंघात जीपीएस परिवाराच्या माध्यमातून आतापर्यंत १७ हजारांहून अधिक नागरिकांची मोफत नेत्रतपासणी करण्यात आली असून, गरजूंवर मोतीबिंदू शस्त्रक्रियाही करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच अनेक रुग्णांना पनवेल येथील नामांकित रुग्णालयात उपचारासाठी नेण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
वृद्ध नागरिकांना उपचारासाठी शहरात येण्याचा त्रास होऊ नये, यासाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त सुरू करण्यात आलेल्या फिरत्या नेत्रालयाच्या माध्यमातून गावागावांत नेत्रतपासणी शिबिरे घेतली जात आहेत. या शिबिरांमधून तपासणी करून पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना मोफत चष्म्यांचे वितरण करण्यात येत आहे.
जीपीएस परिवारातर्फे धरणगाव तालुक्यातील बिलखेडा, कल्याणे खुर्द, धरणगाव, सोनवद, नांदेड, पाळधी तसेच जळगाव तालुक्यातील आसोदा, मनुराबाद, जळके, नशिराबाद, विदगाव आणि म्हसावद या गावांमध्ये मोफत नेत्रतपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरांमधील तपासणीनंतर निवड झालेल्या ६५० लाभार्थ्यांना या कार्यक्रमात चष्म्यांचे वाटप करण्यात आले.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी जीपीएस परिवाराच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. गावागावांत जाऊन आरोग्यसेवा सर्वसामान्यांच्या दारी पोहोचविण्याचा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून, समाजासाठी निस्वार्थ भावनेने काम करणाऱ्या संस्था आणि कार्यकर्ते हीच समाजाची खरी ताकद असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवा नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी केले. त्यांनी जीपीएस परिवारामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध सामाजिक उपक्रमांची तसेच आरोग्य व नेत्रसेवा अभियानाची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अजिंक्य जोशी यांनी केले, तर जीपीएस परिवाराचे संचालक धनराज कासट यांनी उपस्थितांचे आभार मानले.
याप्रसंगी युवा नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अनिल भोळे, तालुकाप्रमुख शिवराज पाटील, माजी सभापती पती जनाआप्पा कोळी, विकास सोसायटीचे चेअरमन जितू पाटील, संदीप सुरळकर, विदगावचे सरपंच राजेंद्र कोळी यांच्यासह विविध पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जीपीएस परिवाराचे पदाधिकारी, संचालक तसेच सचिन भोई आणि अजय कोळी यांनी विशेष परिश्रम घेतले. ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात प्रकाश आणि आनंद निर्माण करणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.
