साईमत न्यूज नेटवर्क –
पेरू : दक्षिण अमेरिकेतील पेरू देशात पर्यटकांचे छोटे विमान कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या नाझ्का लाईन्स परिसरात ही दुर्घटना घडली. विमानातील परदेशी पर्यटकांसह पायलट आणि सहपायलटचा या अपघातात मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी नाझ्का शहराजवळील एका शेतात पर्यटकांना घेऊन जाणारे विमान अचानक कोसळले. उड्डाण केल्यानंतर काही वेळातच विमानात तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. विमान जमिनीवर आदळताच त्याला भीषण आग लागली आणि काही क्षणातच विमान जळून खाक झाले.
स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये विमानाचा पायलट, सहपायलट आणि ११ प्रवाशांचा समावेश आहे. हे विमान इका शहरातून नाझ्का लाईन्सच्या हवाई सफरीसाठी रवाना झाले होते. नाझ्का लाईन्स हे पेरूमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असून, येथील प्राचीन भौगोलिक आकृत्या पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक मोठ्या संख्येने येतात.
हे विमान पेरूमधील ‘एरोडियाना’ या कंपनीचे असल्याची माहिती समोर आली आहे. कंपनीकडून मागील अनेक वर्षांपासून सेसना ग्रँड कॅराव्हॅन विमानांच्या माध्यमातून नाझ्का लाईन्सवरून पर्यटकांना हवाई सफर घडवली जाते.
स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, विमान नाझ्का विमानतळाच्या जवळ पोहोचत असताना त्याचा संपर्क तुटला. दुर्घटनेच्या आदल्या दिवशी परिसरात वाळूचे वादळ आले होते. त्यामुळे हवामानाचा या अपघाताशी काही संबंध आहे का, याचाही तपास केला जात आहे.
पेरूच्या व्यापार आणि पर्यटन मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, विमानात ११ परदेशी पर्यटक आणि दोन कर्मचारी होते. मृतांमध्ये जर्मनीतील दोन, स्पेनमधील दोन आणि इटलीतील सात पर्यटकांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी प्रशासनाने तपास सुरू केला असून, या दुर्घटनेमुळे पेरूच्या पर्यटन क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
