साईमत न्यूज नेटवर्क –
पिंपरी-चिंचवड : शहरातील मोरवाडी परिसरात घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. आर्थिक अडचणींमुळे एका कुटुंबातील तिघांनी जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, या घटनेमुळे नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
मोरवाडी येथील करिष्मा ग्लोरी सोसायटीतील रूम क्रमांक २०१ मध्ये राहणारे विनोद पिल्ले (वय ५०), पत्नी सिरजा पिल्ले (वय ४५) आणि मुलगी पौर्णिमा पिल्ले (वय १९) अशी मृतांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, एक ऑगस्ट रोजी विनोद पिल्ले यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरात आढळून आला. त्याचवेळी घरामध्ये पत्नी सिरजा आणि मुलगी पौर्णिमा या दोघी बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्या. घटनेची माहिती मिळताच त्यांना तातडीने उपचारासाठी वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच दोघींचा मृत्यू झाला.
प्राथमिक तपासात पिल्ले कुटुंबातील तिघांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनास्थळावरून पोलिसांना विनोद पिल्ले यांनी लिहिलेली सुसाईड नोट सापडली असून, त्यामध्ये “आमच्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरू नये,” असा उल्लेख करण्यात आला आहे.
विनोद पिल्ले हे २०२४ पर्यंत एका नामांकित कंपनीत नोकरीला होते. त्यांच्या पत्नी सिरजा पिल्ले या मोरवाडी परिसरातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत कार्यरत होत्या. तर त्यांची मुलगी पौर्णिमा ही पिंपरी-चिंचवडमधील एका नामांकित महाविद्यालयात कॉम्प्युटर सायन्सचे शिक्षण घेत होती.
या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, शेजारी व परिचितांनी हळहळ व्यक्त केली आहे. दरम्यान, आत्महत्येमागील नेमके कारण काय होते, याचा शोध संत तुकाराम नगर पोलीस घेत आहेत. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
