महिला पोलिसाच्या धाडसाने वाचले तरुणाचे प्राण दादर स्थानकात आत्महत्येचा थरारक प्रयत्न फसला
साईमत /मुंबई / प्रतिनिधी
दादर रेल्वे स्थानकावर धावत्या लोकलखाली जाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या २८ वर्षीय व्यक्तीचे प्राण रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचले. अवघ्या काही सेकंदांत प्रसंगावधान राखत महिला हेड कॉन्स्टेबलने धाव घेत त्या व्यक्तीला रुळावरून खेचून सुरक्षित ठिकाणी आणले. या थरारक बचावाची घटना स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
ही घटना ३० जुलै रोजी रात्री १० वाजून ५२ मिनिटांच्या सुमारास दादर रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर घडली. रेल्वे पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीवर असलेल्या हेड कॉन्स्टेबल अनिता नरवडे या सहाय्यक उपनिरीक्षक पठाण, चव्हाण, हेड कॉन्स्टेबल रुपनवर आणि पोलीस कॉन्स्टेबल टपोळे यांच्यासोबत कर्तव्य बजावत होत्या.
यावेळी बोरिवलीच्या दिशेने जाणारी धीम्या गतीची लोकल स्थानकातून सुटत होती. अचानक एका व्यक्तीने प्लॅटफॉर्मवर झोपून धावत्या लोकलच्या फूटबोर्डखाली आपले डोके ठेवले आणि आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात येताच हेड कॉन्स्टेबल अनिता नरवडे यांनी क्षणाचाही विलंब न करता त्या व्यक्तीच्या दिशेने धाव घेतली.
धावत्या ट्रेनपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या त्या व्यक्तीचे पाय पकडून नरवडे यांनी त्याला जोराने मागे ओढले आणि सुरक्षित ठिकाणी आणले. त्यांच्या या धाडसी आणि समयसूचक कृतीमुळे मोठा अनर्थ टळला. काही सेकंदांचा विलंब झाला असता तर गंभीर दुर्घटना घडली असती.
मुंबई सेंट्रल जीआरपीचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र काटकर यांनी सांगितले की, हेड कॉन्स्टेबल अनिता नरवडे यांच्या तत्परतेमुळे संबंधित व्यक्तीचे प्राण वाचले. या घटनेत त्या व्यक्तीला कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. त्याला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत संबंधित व्यक्ती कौटुंबिक वादामुळे मानसिक तणावाखाली असल्याचे समोर आले आहे. तो विवाहित असून काही दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेशातून मुंबईत आला होता. सध्या तो नातेवाईकांकडे राहत असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, त्याने अद्याप आपली ओळख आणि कायमचा पत्ता पोलिसांना सांगण्यास नकार दिला आहे.
घटनेच्या वेळी तो दारूच्या नशेत असल्याचेही पोलिसांनी सांगितले. भविष्यात त्याने पुन्हा असे टोकाचे पाऊल उचलू नये यासाठी त्याचे समुपदेशन करण्यात येणार असून, गरज भासल्यास त्याला व्यसनमुक्ती केंद्रातही पाठवले जाणार आहे.
संबंधित व्यक्तीची ओळख पटवणे, त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क साधणे आणि त्याला मानसिक आधार देण्यासाठी रेल्वे पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, हेड कॉन्स्टेबल अनिता नरवडे यांच्या धाडसाचे आणि कर्तव्यनिष्ठेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
