घराचा आधार हरवला; पुराच्या प्रवाहात वाहून गेलेल्या समाधानचा शोध सुरू
साईमत /पारोळा/ प्रतिनिधी
पारोळा तालुक्यातील शेवगे बुद्रुक येथे अतिवृष्टीमुळे ओसंडून वाहणाऱ्या शिवल्या नाल्यात २२ वर्षीय तरुण वाहून गेल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी (दि. ३१) सकाळी घडली. समाधान चुडामण भिल (वय २२) हा घराकडे जात असताना पाण्याच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेला. घटनेनंतर ग्रामस्थांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. मात्र, शनिवारी सायंकाळपर्यंतही त्याचा कोणताही ठावठिकाणा लागला नव्हता. त्यामुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुसळधार पावसामुळे रस्त्यालगत असलेल्या शिवल्या नाल्याला मोठ्या प्रमाणात पूर आला होता. सकाळी सुमारे दहा वाजेच्या सुमारास समाधान भिल हा घराकडे जात असताना पाण्याच्या वेगवान प्रवाहाचा अंदाज न आल्याने तो वाहून गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी स्वतःच्या परीने शोधकार्य सुरू केले. मात्र, पाण्याचा वेग आणि वाढलेली पातळी यामुळे त्यांना यश आले नाही.
शिवल्या नाल्याचे पाणी कंकराज लघुप्रकल्पात जात असल्याने प्रशासनाने शोधमोहीम त्या दिशेने केंद्रित केली आहे. तहसीलदार डॉ. उल्हास देवरे, पोलिस निरीक्षक दीपक पाटील, तलाठी तसेच महसूल व पोलिस प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेनुसार सलग शोधकार्य सुरू आहे. यंत्रणेकडून उपलब्ध साधनसामग्रीच्या सहाय्याने तरुणाचा शोध घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यात येत आहे.
दरम्यान, समाधान भिल याची कौटुंबिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचे वडील यापूर्वीच निधन पावले असून तो आपल्या वृद्ध आईसोबत राहत होता. घरातील एकमेव कर्ता असलेल्या समाधानवर शेतीची कामे व मजुरी करून आईचा उदरनिर्वाह करण्याची जबाबदारी होती. अचानक घडलेल्या या घटनेमुळे वृद्ध आईवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण गावातून हळहळ व्यक्त होत आहे.
समाधानचा लवकरात लवकर शोध लावण्यासाठी प्रशासनाने अधिक प्रभावी यंत्रणा तैनात करावी, अशी मागणी त्याच्या आईने, नातेवाईकांनी आणि ग्रामस्थांनी केली आहे. दुसऱ्या दिवसापर्यंतही शोधकार्य सुरू असून समाधानचा शोध कधी लागतो, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.
