जिल्हाप्रमुखांच्या बैठकीत संघटनबांधणीवर भर; 2029 च्या निवडणुकांसाठी आतापासून तयारीचे आदेश
साईमत मुंबई प्रतिनिधी
शिवसेना पक्षाच्या नाव आणि निवडणूक चिन्हावरील न्यायालयीन वादाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना महत्त्वाचा संदेश दिला आहे. “शिवसेनेचं चिन्ह आपल्यालाच मिळेल, असा पूर्ण विश्वास आहे. आणि तसे झाले नाही, तर ते चिन्ह गोठवलं जाईल,” असे ठाम विधान उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या जिल्हाप्रमुख व विधानसभा संपर्कप्रमुखांच्या बैठकीत केले.
शिवसेना भवन येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत जिल्हाप्रमुख आणि विधानसभा मतदारसंघ संपर्कप्रमुखांची ऑनलाइन बैठक पार पडली. सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्हासंदर्भातील सुनावणी नुकतीच झाल्यानंतर या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते.
सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीनंतर ठाकरेंची प्रतिक्रिया
एकनाथ शिंदे यांनी 2022 मध्ये शिवसेनेत बंड केल्यानंतर पक्षात मोठी फूट पडली. त्यानंतर बहुसंख्य आमदारांचा पाठिंबा शिंदे गटाला मिळाल्याने निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला दिले. या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून, या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.
नुकत्याच झालेल्या सुनावणीत ठाकरे गटाची बाजू ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी मांडली. या सुनावणीनंतर उद्धव ठाकरे यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना न्यायालयीन प्रक्रियेबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली.
“चिन्ह मिळेल; अन्यथा गोठवले जाईल”
बैठकीत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, न्यायालयीन प्रक्रियेवर त्यांचा पूर्ण विश्वास असून शिवसेनेचे मूळ चिन्ह ठाकरे गटालाच मिळेल. मात्र, जर तसे झाले नाही, तर ते चिन्ह कोणत्याही एका गटाकडे कायमस्वरूपी राहणार नाही आणि ते गोठवले जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
संघटन मजबूत करण्याच्या सूचना
यावेळी उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या संघटनात्मक कामकाजावरही भर दिला. एसआयआर (Special Intensive Revision) प्रक्रियेकडे अत्यंत गांभीर्याने लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या. तसेच, ज्यांना सोपविण्यात आलेली जबाबदारी पार पाडणे शक्य होत नसेल त्यांनी पदाचा आग्रह न धरता ती जबाबदारी इतरांकडे सोपवावी, असे स्पष्ट निर्देशही त्यांनी दिले.
2029 च्या निवडणुकांसाठी आतापासून तयारी
बैठकीत आगामी राजकीय रणनीतीवरही चर्चा झाली. 2029 च्या निवडणुकांना अवघी तीन वर्षे शिल्लक असल्याचे सांगत उद्धव ठाकरे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना आतापासूनच मतदारसंघनिहाय संघटनबांधणी, बूथ स्तरावरील तयारी आणि जनसंपर्क वाढविण्याचे निर्देश दिले. पक्ष अधिक सक्षम करण्यासाठी प्रत्येक पदाधिकाऱ्याने सक्रियपणे काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
राज्यातील बदलत्या राजकीय घडामोडी आणि सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यामुळे शिवसेना पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्हावरील वाद पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.
