साईमत -नशिराबाद – प्रतिनिधी |
जागतिक व्याघ्र दिनाचे औचित्य साधून न्यू इंग्लिश स्कूल, नशिराबाद येथे विद्यार्थ्यांमध्ये व्याघ्र संवर्धन व वन्यजीव संरक्षणाबाबत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना वाघांचे पर्यावरणातील महत्त्व, त्यांचे संरक्षण आणि जैवविविधतेतील त्यांच्या भूमिकेबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
कार्यक्रमादरम्यान माहितीपूर्ण व्हिडिओ दाखवून विद्यार्थ्यांना व्याघ्र संवर्धनाची गरज पटवून देण्यात आली. निसर्ग व जंगलाचे संरक्षण करणे, वन्यजीवांबाबत आदराची भावना ठेवणे तसेच अंधश्रद्धा व अफवांवर विश्वास न ठेवता वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. “प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी ओळखून काम केल्यास भविष्यातील पिढ्यांसाठी समृद्ध जैवविविधता जतन करता येईल,” असा संदेश याप्रसंगी देण्यात आला.
या कार्यक्रमाला नशिराबाद शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष योगेश पाटील, मुख्याध्यापक एस. ए. बनसोडे, सौ. सीमा पाटील, सौ. जयश्री पगारे, सौ. वंदना खाचने, सौ. सोनल नारखेडे, सौ. एन. एम. चौधरी, श्रीमती सुचिता वासनिक, जी. टी. पाटील यांच्यासह शिक्षकवृंद व कर्मचारी माधव चौधरी आणि नरेंद्र धर्माधिकारी उपस्थित होते.
या उपक्रमाचे आयोजन वन्यजीव रक्षक भूषण दळवी, अजय कोळी आणि मंगल कोळी यांनी केले.
”वाघ वाचला तर जंगल वाचेल, जंगल वाचले तर निसर्ग वाचेल आणि निसर्ग वाचला तरच मानवाचे भविष्य सुरक्षित राहील,” या प्रेरणादायी संदेशाने कार्यक्रमाची सांगता झाली.
