आपत्कालीन मदतीसाठी ११२ क्रमांकाचा वापर करण्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांचे आवाहन
साईमत -जळगाव- प्रतिनिधी |
शहरात कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तातडीने पोलीस मदत मिळावी आणि ‘डायल ११२’ (Dial 112) या हेल्पलाइनबाबत व्यापक जनजागृती व्हावी, यासाठी जळगाव पोलीस प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील एसटी बस आणि ऑटो रिक्षांवर ‘डायल ११२’ चे माहितीपत्रके व आकर्षक पोस्टर्स लावून नागरिकांपर्यंत हा संदेश पोहोचवला जात आहे.
परिसरात संशयास्पद हालचाली, अपघात, महिलांची छेडछाड, चोरी किंवा मारहाण यांसारखी कोणतीही आपत्कालीन घटना घडल्यास नागरिकांनी कोणताही विलंब न करता थेट ‘डायल ११२’ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस विभागाने केले आहे.
२४ तास सेवेत तत्पर
‘डायल ११२’ ही सेवा २४ तास कार्यरत असून, कॉल प्राप्त होताच नियंत्रण कक्षाकडून तात्काळ जवळच्या पोलीस बीट मार्शल व गाडीला माहिती दिली जाते. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांत पोलीस पथक घटनास्थळी पोहोचून मदत कार्य सुरू करते. त्यामुळे कोणत्याही प्रसंगी न घाबरता या हेल्पलाईनचा वापर करावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
सार्वजनिक वाहतुकीची साधने असलेल्या बस आणि रिक्षांवर लावण्यात आलेल्या पोस्टर्समुळे दररोज प्रवास करणाऱ्या हजारो नागरिकांपर्यंत ही माहिती सहज पोहोचणार असून, यामुळे पोलीस आणि नागरिक यांच्यातील समन्वय अधिक दृढ होण्यास मदत होणार आहे.
