चिखलमय रस्त्यांमुळे नागरिक व विद्यार्थी त्रस्त; मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन
साईमत -जळगाव- प्रतिनिधी |
नगरोत्थान भुयारी गटार योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांमुळे नशिराबाद शहरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. भर पावसाळ्यात हे रस्ते चिखलमय झाल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर, रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संतप्त नागरिकांनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
भुयारी गटार योजनेसाठी उकरलेले रस्ते काम पूर्ण झाल्यानंतरही पूर्ववत करण्यात आलेले नाहीत. त्यातच पावसाचे पाणी साचून सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि नोकरदारांचे प्रचंड हाल होत आहेत. खराब रस्त्यांमुळे अनेक वाहनधारक घसरून पडून जखमी होत असून काहींना कायमस्वरूपी अपंगत्व येण्याचा धोका निर्माण झाला आहे.
भुयारी गटार योजनेमुळे खराब झालेल्या सर्व रस्त्यांची प्रशासनाने तात्काळ दुरुस्ती करून नागरिकांना सुरक्षित आणि सुरळीत रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल आणि उद्भवणाऱ्या परिस्थितीला प्रशासनच जबाबदार राहील, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष मुकुंदा रोटे, शहराध्यक्ष जितेंद्र बऱ्हाटे, देवेंद्र भंगाळे, गोपाळ भारुडे, शुभम भावसार, रोहन महाजन, रहीम शेख यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
