अट्टल दुचाकी चोर गजाआड चार चोरीच्या मोटारसायकली जप्त
साईमत /पाचोरा /प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यात वाढत्या वाहन चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी पाचोरा पोलिसांनी प्रभावी कारवाई करत एका अट्टल दुचाकी चोराला अटक केली आहे. आरोपीकडून तब्बल १ लाख २० हजार रुपये किमतीच्या चार चोरीच्या मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या असून, विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या वाहन चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अमोल राजेंद्र ढमाळे (वय २७, रा. नंदीचे खेडगाव, ता. पाचोरा, ह.मु. काळे नगर, जळगाव) असे आहे. जिल्ह्यातील वाहन चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावून आरोपींना अटक करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिल्यानंतर पाचोरा पोलिसांनी तपासाला वेग दिला होता.
दरम्यान, वाहन चोरीच्या गुन्ह्यांचा तपास सुरू असताना पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, अमोल ढमाळे हा नंदीचे खेडगाव परिसरातील जळगाव रोडलगत एका शेतातील शेडमध्ये लपून बसला आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी नियोजनबद्ध सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने चार मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली.
आरोपीच्या ताब्यातून जप्त करण्यात आलेल्या चारही दुचाकी या बजाज प्लॅटिना कंपनीच्या असून, प्रत्येकी सुमारे ३० हजार रुपये किमतीच्या आहेत. एकूण १ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. तपासादरम्यान आरोपी मास्टर कीच्या सहाय्याने लॉक उघडून मुख्यतः प्लॅटिना मोटारसायकली चोरी करत असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांच्या तपासात या चारही मोटारसायकलींची चोरी भडगाव पोलीस ठाणे, पाचोरा पोलीस ठाणे तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीतून झाल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम ३०३(२) अन्वये गुन्हे दाखल असून, आरोपीविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप शेवाळे, पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायाळ तसेच विलास पाटील, श्रीकांत गायकवाड, उमेश पाटील, योगेश पाटील, संदीप पाटील आणि हरीश परदेशी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
