‘राजमाता जिजाऊ’ बसांचा सोहळा आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण
साईमत /मुक्ताईनगर /प्रतिनिधी
ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी जीवनवाहिनी ठरणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सेवेला मुक्ताईनगर येथे नवी ताकद मिळाली आहे. मुक्ताईनगर एसटी आगाराच्या ताफ्यात अत्याधुनिक सुविधांनी सज्ज अशा पाच ‘राजमाता जिजाऊ’ बस दाखल झाल्या असून, त्यांचे लोकार्पण आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते रविवारी उत्साहात करण्यात आले.
नवीन बस सेवेत दाखल झाल्याने मुक्ताईनगर तालुक्यासह परिसरातील प्रवाशांना अधिक दर्जेदार, सुरक्षित आणि वेळेवर वाहतूक सुविधा उपलब्ध होणार आहे. एसटी महामंडळाकडून ग्रामीण भागातील प्रवाशांची गरज लक्षात घेऊन बससेवा मजबूत करण्यावर भर दिला जात असून, त्याचाच एक भाग म्हणून या नवीन बस आगाराला मिळाल्या आहेत.
लोकार्पण कार्यक्रमाच्या प्रारंभी नवीन बसांचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या बस प्रवासी सेवेसाठी रवाना करण्यात आल्या. यावेळी उपस्थित पदाधिकारी, एसटी महामंडळाचे अधिकारी-कर्मचारी आणि नागरिकांनी नवीन बससेवेचे स्वागत केले.
मुक्ताईनगर आगारासाठी नवीन बस उपलब्ध करून देण्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेले आश्वासन पूर्ण झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. या बसांमुळे जुन्या वाहनांवरील अतिरिक्त भार कमी होण्यास मदत होणार असून, ग्रामीण मार्गांवरील एसटी सेवेची कार्यक्षमता वाढणार आहे.
विद्यार्थी, महिला, शेतकरी, नोकरदार तसेच ज्येष्ठ नागरिकांना या नव्या बससेवेचा मोठा फायदा होणार आहे. प्रवास अधिक आरामदायी आणि सुरक्षित होण्याबरोबरच ग्रामीण भागातील दळणवळण व्यवस्थेलाही चालना मिळणार आहे.
या कार्यक्रमाला शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, एसटी महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवीन बस सेवेमुळे मुक्ताईनगर आगाराच्या सुविधांमध्ये भर पडली असून, प्रवाशांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
