मुंबई
NEET पेपरफुटी प्रकरणावरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर देशाच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या घडामोडींनंतर महाराष्ट्रातील राजकीय हालचालींनाही वेग आला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील दिल्लीला रवाना होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
जंतर-मंतरवरील आंदोलनाला मोठे यश
दिल्लीतील जंतर-मंतर येथे NEET पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) च्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनात लाखो विद्यार्थी सहभागी झाले होते. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी आंदोलनकर्त्यांची प्रमुख मागणी होती. अखेर प्रधान यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर या आंदोलनाला मोठे यश मिळाल्याचे बोलले जात आहे.
अमित शाह यांच्या फोननंतर तातडीने दिल्ली दौरा
सूत्रांच्या माहितीनुसार, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची माहिती दुपारी सुमारे २:२० वाजता समोर आल्यानंतर काही मिनिटांतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीसाठी रवाना झाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा फोन आल्यानंतर त्यांनी तातडीने दिल्ली गाठल्याची माहिती मिळत आहे.
मुख्यमंत्री फडणवीसांनंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही दिल्लीला रवाना होणार असून ते अमित शाह यांची भेट घेणार असल्याची चर्चा आहे. या भेटीत नेमक्या कोणत्या विषयावर चर्चा होणार, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी दिल्लीतील या घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.
“सरकारला उशिरा जाग आली…” – संजय राऊत
दरम्यान, प्रधानांच्या राजीनाम्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. “सरकारला उशिरा का होईना जाग आली, त्यासाठी अनेक तरुण-तरुणींना आपलं रक्त सांडावं लागलं, हाडं मोडून घ्यावी लागली,” असे राऊत यांनी म्हटले आहे. तसेच “फडणवीस यांना केंद्रात शिक्षणमंत्रीपद मिळू शकतं,” असा दावाही त्यांनी केला.
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर केंद्रातील राजकीय समीकरणांमध्ये काय बदल होतात आणि त्याचा महाराष्ट्रातील सत्तासमीकरणांवर काही परिणाम होतो का, याकडे आता राज्यासह देशाचे लक्ष लागले आहे.
