गोपनीय माहितीच्या आधारे पहाटेची धडक कारवाई इनोव्हा कारसह ,प्रतिबंधित गुटखा, पानमसाला जप्त
साईमत /वरणगाव /प्रतिनिधी
वरणगाव पोलिसांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर धडक कारवाई करत महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असलेल्या गुटखा, सुगंधित पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थांची मोठी अवैध वाहतूक उघडकीस आणली. गोपनीय माहितीच्या आधारे राबविण्यात आलेल्या या कारवाईत सुमारे ₹५ लाख १७ हजार ८६८ किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली इनोव्हा कारही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. या प्रकरणी चेतन लक्ष्मण नारखेडे (वय २८, रा. खालची आळी, नशिराबाद, ता. जि. जळगाव) याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे ८.२० वाजता मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील कपिलवस्ती परिसरात, मुक्ताईनगरकडे जाणाऱ्या मार्गावर पोलिसांनी सापळा रचला. त्यानंतर २५ जुलै रोजी पहाटे ३.३३ वाजता संशयित वाहनाची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान वाहनात महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेला मोठ्या प्रमाणातील गुटखा, विमल पानमसाला, विविध प्रकारची तंबाखू तसेच इतर तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले.
कारवाईदरम्यान विविध कंपन्यांचा गुटखा, विमल पानमसाला, केसी ब्रँड तंबाखू आणि इतर प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांसह वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली इनोव्हा कार (एमएच-२० बीडी-३०००) जप्त करण्यात आली. वाहनासह एकूण जप्त मुद्देमालाची किंमत ₹५,१७,८६८ इतकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणी संशयित चेतन लक्ष्मण नारखेडे याच्याविरुद्ध वरणगाव पोलिस ठाण्यात संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक अमितकुमार बागुल, पोलीस उपनिरीक्षक एस. के. बेंडकोळी तसेच वरणगाव पोलिस ठाण्याच्या पथकाने संयुक्तरीत्या केली. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस. के. बेंडकोळी करीत आहेत.
