खोपोली येथील सुमारे १८ व्या शतकातील ऐतिहासिक श्री भगवान वीरेश्वर (विश्वेश्वर) मंदिरात झालेल्या धाडसी चोरीच्या घटनेचा अवघ्या काही दिवसांत पर्दाफाश करण्यात खोपोली पोलिसांना यश आले आहे. मंदिराच्या गाभाऱ्यातून तब्बल १७ किलो वजनाची व सुमारे २८ लाख रुपये किमतीची चांदीची पिंड, मुखवटा आणि आवरण चोरून नेणाऱ्या पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यातील चार सराईत आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
या घटनेमुळे परिसरातील भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली होती. ऐतिहासिक आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्व असलेल्या मंदिरातील चोरीमुळे सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हाती घेत आरोपींपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (१९ जुलै) मध्यरात्री सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास चार चोरट्यांनी मंदिराच्या मागील प्रवेशद्वारावरील साखळी आणि कुलूप तोडून गाभाऱ्यात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी भगवान वीरेश्वराच्या मूर्तीवरील चांदीचा मुखवटा, आवरण आणि चांदीची पिंड असा सुमारे १७ किलो वजनाचा मौल्यवान ऐवज चोरून नेला.
रविवारी पहाटे नेहमीप्रमाणे मंदिर उघडण्यासाठी आलेले साहाय्यक पुजारी किशोर शिगवान यांनी गाभाऱ्यातील चांदीचा ऐवज गायब असल्याचे पाहताच मंदिर विश्वस्त मंडळाला माहिती दिली. त्यानंतर खोपोली पोलिस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल करण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे वेगाने फिरविण्यात आली. मंदिर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी करण्यात आली. फुटेजमध्ये तोंडाला रुमाल बांधलेले चार जण मध्यरात्री मंदिरात प्रवेश करून चोरी करताना स्पष्टपणे दिसून आले. त्यावरून भारतीय न्याय संहितेच्या (BNS) संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि खबऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी विशेष तपास पथके तयार केली. या पथकांनी पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत छापेमारी करून अमोल कसबे, विकास अगिवले, दिलीप जाधव आणि सखाराम गायकवाड या चार सराईत आरोपींना अटक केली. चौकशीदरम्यान आरोपींनी चोरीचा माल लपवून ठेवलेल्या ठिकाणाची माहिती दिली असून, पोलिसांनी चोरलेला मौल्यवान ऐवज जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
या कारवाईमुळे ऐतिहासिक मंदिरातील चोरीचा गुन्हा अल्पावधीत उघडकीस आणण्यात खोपोली पोलिसांना यश आले असून, भाविकांनीही या जलद कारवाईबद्दल समाधान व्यक्त केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, आरोपींनी यापूर्वी अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत का, याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे.
