साईमत -जळगाव- प्रतिनिधी |
शहरातील इच्छादेवी चौकाजवळील राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या ‘फेमस ट्रेडर्स’ दुकानासमोर आज एका तरुणाचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. श्याम सुभाष तांबेश्वर (रा. तांबापूर, जळगाव) असे मृत आढळलेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इच्छादेवी चौकातील महामार्गावर श्याम तांबेश्वर हा तरुण पडून असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्याला तत्काळ उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच शासकीय रुग्णालयात नातेवाईकांनी व स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
घातपाताचा गंभीर आरोप
हा अपघात किंवा अकस्मात मृत्यू नसून घातपात असल्याचा गंभीर आरोप मयत श्याम तांबेश्वर याच्या नातेवाईकांनी केला आहे. घटनास्थळाची परिस्थिती आणि एकूणच प्रकार पाहता श्यामची हत्या करण्यात आल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.
सध्या या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र, घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी या प्रकरणाची सर्व बाजूंनी सखोल व निष्पक्ष चौकशी करावी, तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणी मयताच्या नातेवाईकांनी केली आहे.
