साईमत -जळगाव- प्रतिनिधी |
भुसावळ : सोलर सिस्टीमची मंजुरी आणि रिलिज ऑर्डर देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच घेताना महावितरणच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले. नितीन अभिमन्यू पाटील (वय ४५) असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव असून, या धडक कारवाईमुळे महावितरण वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
सोलर सिस्टीमची मंजुरी : तक्रारदाराच्या पत्नीच्या नावावर सोलर सिस्टीम बसवण्याची प्रक्रिया सुरू होती.
दरडोई १ हजारांची मागणी : संबंधित दोन ग्राहकांच्या सोलर सिस्टीमची मंजुरी आणि रिलिज ऑर्डर देण्यासाठी नितीन पाटील याने प्रत्येकी १ हजार रुपयेप्रमाणे एकूण २ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी थेट जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेत तक्रार नोंदवली.
तक्रारदाराच्या अर्जावरून एसीबीने पंचांसमक्ष लाचेच्या मागणीची पडताळणी केली. पडताळणीत लाच मागितल्याचे निष्पन्न होताच, गुरुवारी महावितरण कार्यालयात सापळा रचण्यात आला. ठरल्यानुसार तक्रारदाराकडून २ हजार रुपयांची रक्कम स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने नितीन पाटील याला रंगेहाथ ताब्यात घेतले.
या प्रकरणी आरोपी नितीन पाटील याच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, १९८८ अन्वये भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
ही कारवाई एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे व त्यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.
