साईमत न्यूज नेटवर्क –
बिहारची राजधानी पाटणा येथे भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने केलेल्या आंदोलनाच्या विरोधात भाजपकडून देशव्यापी आंदोलन पुकारण्यात आले असतानाच पाटणातील काँग्रेस कार्यालयाबाहेर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष उफाळून आला.
मिळालेल्या माहितीनुसार, भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या मुख्य कार्यालयाला घेराव घालण्यास सुरुवात केली होती. यावेळी कार्यालयाबाहेर उपस्थित असलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांशी त्यांची शाब्दिक बाचाबाची झाली. काही वेळातच या वादाचे रूपांतर मोठ्या संघर्षात झाले. दोन्ही बाजूंनी दगडफेक आणि लाठीमार सुरू झाल्याने परिसरात काही काळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले.
या घटनेत काही भाजप कार्यकर्ते जखमी झाले असून काहींच्या डोक्याला दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे. जखमी कार्यकर्त्यांच्या डोक्यातून रक्तस्राव होत असल्याचे दृश्य घटनास्थळी पाहायला मिळाले. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला.
हा संघर्ष भाजपने काँग्रेसच्या आंदोलनाविरोधात आयोजित केलेल्या देशव्यापी निषेध आंदोलनाचा भाग असल्याचे सांगण्यात येत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी वाड्रा यांच्यासह पक्षाच्या नेत्यांनी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर NEET पेपरफुटी आणि तरुणांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ आंदोलन केले होते. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी राहुल गांधी आणि इतर नेत्यांना ताब्यात घेतले होते. काही तासांनंतर त्यांची सुटका करण्यात आली.
या घटनेनंतर भाजपने काँग्रेसविरोधात देशभर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचाच भाग म्हणून पाटण्यात आंदोलन करण्यात आले असताना दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष झाला. सध्या काँग्रेस कार्यालय परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे.
