साईमत -जळगाव- प्रतिनिधी |
देशात धार्मिक अल्पसंख्याकांवर होणारे हल्ले, मॉब लिंचिंगच्या घटना आणि संविधानाने दिलेल्या धार्मिक स्वातंत्र्यावरील आक्रमणाविरोधात आज जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारत मुक्ती मोर्चा आणि राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात विविध सामाजिक संघटनांचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
हे धरणे आंदोलन भारत मुक्ती मोर्चाचे जळगाव जिल्हा अध्यक्ष देवानंद निकम व राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे राज्य उपाध्यक्ष डॉ. शाकीर शेख यांच्या नेतृत्वात पार पडले. आंदोलनादरम्यान केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदवत १२ प्रमुख मागण्यांचे निवेदन अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द करण्यात आले.
या १२ प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन
वक्फ सुधारणा: वक्फ संशोधन अधिनियम २०२६ तात्काळ रद्द करण्यात यावा.
धार्मिक स्वातंत्र्य: घटनेतील कलम २५, २६, २७, २८ आणि २९ द्वारे मिळालेल्या धार्मिक स्वातंत्र्याच्या संवैधानिक अधिकारांचे रक्षण करावे.
मॉब लिंचिंगवर बंदी: मॉब लिंचिंगच्या नावाखाली होणाऱ्या हत्यांना कडक कायद्याद्वारे पायबंद घालण्यात यावा.
निर्दोष तरुणांची सुटका: बेकसूर मुस्लिम तरुण व उलेमांची तात्काळ सुटका करण्यात यावी.
कायदा अंमलबजावणी: ‘कम्युनल वायलंस प्रिव्हेंशन ॲक्ट’ तात्काळ लागू करण्यात यावा.
धार्मिक स्थळांचे रक्षण: धार्मिक स्थळांवर होणारे हल्ले त्वरित रोखण्यात यावेत.
संवैधानिक हक्क: कलम ३४१(३) वरील बंदी उठवण्यात यावी.
जातनिहाय जनगणना: देशात पारदर्शक जातीआधारित जनगणना करण्यात यावी.
महापुरुषांचा सन्मान: हजरत मोहम्मद साहब आणि बहुजन महापुरुषांची केली जाणारी बदनामी थांबवण्यात यावी.
आयोग शिफारसी: सच्चर, गोपाळसिंग, मिश्रा आणि कुंडू कमिशनच्या शिफारसींची अंमलबजावणी करण्यात यावी.
तेढ निर्माण करणाऱ्यांवर बंदी: समाजात धार्मिक तेढ व द्वेष निर्माण करणाऱ्या संघटनांवर कायदेशीर बंदी घालावी.
प्लेस ऑफ वर्शिप ॲक्ट: ‘प्लेस ऑफ वर्शिप ॲक्ट १९९१’ ची काटेकोर अंमलबजावणी व्हावी.
या आंदोलनाला विविध पुरोगामी आणि सामाजिक संघटनांनी पाठिंबा दर्शवला. आंदोलनात बहुजन मुक्ती पार्टीचे राज्य प्रभारी सुमित्र अहिरे, अ. करीम सालार सर, नियाज अली फाऊंडेशनचे अय्याज अली नियाज अली, फैजपूरचे माजी नगराध्यक्ष मुबारक भाई, माजी नगरसेवक रियाज बागवान, खालीद बागवान, सावरकर रिक्षा युनियनचे अध्यक्ष दिलीप सपकाळे उपस्थित होते.
याशिवाय बहुजन मुक्ती पार्टीचे रविंद्र मोरे, खुशाल सोनवणे, रविंद्र बाविस्कर; राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे हाफिज फिरोज, गनी शाह, अकील कासार, मुफ्ती खालिद, रफिक शेख, इरफान शेख, जमील शेख, सै. कलीम रिजवान; पीस पार्टीचे आरिफ देशमुख; भारत मुक्ती मोर्चाचे जाकीर कुरेशी, दिलीप जाधव, डी.एम. भालेराव, मनोहर लोखंडे, त्र्यंबक सोनवणे, रमेश थाटे, दिलीप इंगळे; बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे चंद्रशेखर अहिरराव, दिनेश सपकाळे, सुनिल सपकाळे, प्रा. किसन हेरोळे, शैलेश नन्नवरे; तसेच राष्ट्रीय मूलनिवासी पेन्शनर संघाचे मनोहर कोचुरे, सुनिल सोनवणे, दिलीप तासखेडकर, संतोष साळवे आणि तबन ह्याळिंगे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
