साईमत -जळगाव- प्रतिनिधी |
शहरातील दीक्षित वाडी परिसरातील मुख्य रस्त्यावरून आत जाणाऱ्या मार्गावरील मंजूर कल्व्हर्टचे (मोरीचे) काम प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अद्याप पूर्ण झालेले नाही. यामुळे या रस्त्यावर जीवघेणे खड्डे पडले असून नागरिक व प्रवाशांना दररोज मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सध्या सुरू असलेल्या पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने वाहनचालकांना खड्ड्यांच्या खोलीचा अंदाज येत नाही. परिणामी दररोज दुचाकी तसेच चारचाकी वाहने खड्ड्यांत अडकून अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. या बिकट परिस्थितीमुळे दुचाकीस्वार, ज्येष्ठ नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
”जीवितहानी झाल्यावरच प्रशासन जागे होणार का?”
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या ठिकाणी कल्व्हर्टचे काम प्रशासनाकडून मंजूर झाले आहे. मात्र, प्रत्यक्ष कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. प्रशासनाच्या या धिम्या कारभारावर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. “एखादा मोठा अपघात किंवा जीवितहानी झाल्यानंतरच संबंधित विभागाला जाग येणार का?” असा खरमरीत सवाल स्थानिक रहिवाशांकडून उपस्थित केला जात आहे.
रस्त्याची झालेली दुरवस्था आणि अपघातांची वाढती शक्यता लक्षात घेता, संबंधित विभागाने तात्काळ या समस्येची दखल घ्यावी. मंजूर कल्व्हर्टचे काम त्वरित पूर्ण करून रस्त्यावरील जीवघेणे खड्डे बुजवावेत, अशी आग्रही मागणी दीक्षित वाडी परिसरातील स्थानिक नागरिक आणि प्रवाशांकडून केली जात आहे.
