साईमत न्यूज नेटवर्क –
पिंपरी : लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत लोकप्रिय असलेले इन्स्टंट नूडल्स आता अन्नसुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चेत आले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील बोपखेल परिसरात एका ग्राहकाने खरेदी केलेल्या पॅकबंद नूडल्सच्या पाकिटात बुरशीसदृश थर आणि कीटक आढळल्याचा आरोप केला आहे.
बोपखेल येथील रहिवासी महेंद्र भिंगारदिवे यांनी दुकानातून नूडल्सचे पॅकेट खरेदी केले होते. ते शिजवण्यासाठी पाकीट उघडले असता नूडल्सवर काळपट आणि हिरवट रंगाचा बुरशीसदृश थर तसेच कीटक दिसून आल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच नूडल्समधून दुर्गंधी येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुदत संपण्यापूर्वीच उत्पादन खराब असल्याचा आरोप करण्यात आल्याने ग्राहकांमध्ये पॅकबंद खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. विशेषतः लहान मुले मोठ्या प्रमाणात इन्स्टंट नूडल्स खात असल्याने या प्रकरणाने अन्नसुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
संबंधित ग्राहकाने नूडल्सच्या पाकिटावरील बॅच क्रमांक, उत्पादन तारीख, ‘बेस्ट बिफोर’ तारीख आणि FSSAI परवाना क्रमांक तपासून कंपनी तसेच अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार केल्याचे सांगितले आहे. आता या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाकडून काय कारवाई केली जाते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
