साईमत न्यूज नेटवर्क –
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) जाहीर पाठिंबा दिला आहे. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी मनसे नेते अमित ठाकरे आणि बाळा नांदगावकर यांनी जंतर-मंतर येथे भेट देत आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला.
आंदोलनादरम्यान सोनम वांगचुक यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या घटनेवर अमित ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, लोकशाही व्यवस्थेत शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या व्यक्तीशी अशा प्रकारची वागणूक देणे अयोग्य असल्याचे म्हटले.
अमित ठाकरे हे सोनम वांगचुक यांची भेट घेण्यासाठी आंदोलनस्थळी पोहोचले होते. मात्र, प्रकृती अस्वस्थ असल्याचे कारण देत दिल्ली पोलिसांनी सकाळीच त्यांना रुग्णालयात हलवल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे त्यांची प्रत्यक्ष भेट होऊ शकली नाही. त्यानंतर अमित ठाकरे यांनी वांगचुक यांच्या जागी बेमुदत अन्नत्याग उपोषण सुरू ठेवणारे अभिजीत दीपके यांची भेट घेतली आणि आंदोलनातील घडामोडींची माहिती जाणून घेतली.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना अमित ठाकरे म्हणाले, “दिल्लीत पोहोचल्यानंतर आम्हाला सोनम वांगचुक यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात नेल्याचे सांगण्यात आले. मात्र, नंतर समोर आलेल्या काही व्हिडिओंमध्ये काही जण सिव्हिल ड्रेसमध्ये येऊन स्वतःला डॉक्टर असल्याचे सांगत होते. त्यांनी पडदा उभा करून वांगचुक यांना आंदोलनस्थळावरून हलवल्याचे दिसत आहे. या संपूर्ण प्रकारामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.”
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही सोशल मीडियावरील ‘एक्स’ पोस्टद्वारे या प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी सरकारवर टीका करत, “एखादी व्यक्ती अनेक दिवसांपासून उपोषण करत असताना सरकारने संवाद साधण्याचाही प्रयत्न केला नाही. आंदोलन दडपण्याऐवजी त्यावर चर्चा होणे आवश्यक आहे,” असे मत व्यक्त केले.
