पांढरी शिवारातील अवैध हातभट्टी उद्ध्वस्त दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
साईमत /अडावद /प्रतिनिधी
अवैध गावठी हातभट्टी दारू निर्मितीविरोधात अडावद पोलिसांनी धडक कारवाई करत पांढरी शिवारातील नाल्यालगत सुरू असलेला हातभट्टीचा अड्डा उद्ध्वस्त केला. या कारवाईत तब्बल १ लाख ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पंचांसमक्ष तो जागेवरच नष्ट करण्यात आला. या प्रकरणी एका आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अडावद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे यांना पांढरी शिवारातील नाल्याच्या काठी अवैध गावठी दारू तयार केली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. माहितीची खातरजमा झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने पथकासह घटनास्थळी धाड टाकली. अचानक झालेल्या या कारवाईमुळे हातभट्टी चालकांची एकच धावपळ उडाली. पोलिसांनी संपूर्ण अड्ड्यावर छापा टाकत दारू निर्मितीसाठी वापरले जाणारे साहित्य जप्त करून अवैध व्यवसायावर आळा घातला.
कारवाईदरम्यान पोलिसांना २ हजार लिटर गूळ-नवसागर मिश्रित कच्चे व पक्के रसायन भरलेले १२ प्लास्टिकचे ड्रम, ४० लिटर तयार गावठी हातभट्टीची दारू, लोखंडी पत्र्याची टाकी, लाकडी चूल तसेच दारू निर्मितीसाठी वापरले जाणारे विविध साहित्य आढळून आले. जप्त करण्यात आलेल्या या सर्व मुद्देमालाची किंमत सुमारे १ लाख ५१ हजार रुपये इतकी असून पंचांच्या उपस्थितीत तो जागेवरच नष्ट करण्यात आला.
या प्रकरणी कैलास काशिनाथ कोळी (वय ३३, रा. इंदिरा नगर प्लॉट परिसर, अडावद) याच्याविरुद्ध अडावद पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यातील कलम ६५(फ), ६५(ब), ६५(क) व ६५(ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन नागरे, पोलीस हेडकॉन्स्टेबल किरण शिरसाठ, जितेंद्र सोनवणे, शेषराव तोरे, भरत नाईक तसेच पोलीस कॉन्स्टेबल भूषण चव्हाण आणि प्रदीप पाटील यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
या प्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल किरण शिरसाठ यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास अडावद पोलीस ठाणे करीत आहे. परिसरातील अवैध हातभट्ट्या, गावठी दारू निर्मिती आणि इतर बेकायदा धंद्यांविरोधात भविष्यातही अशाच कठोर कारवाया सुरू राहतील, असा इशारा अडावद पोलिसांनी दिला आहे. या कारवाईमुळे अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून कायद्याचा धाक पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
