तापी नदीपात्र आणि राजाभोये नाल्यातील अवैध हातभट्ट्या उद्ध्वस्त; दोन आरोपींवर गुन्हे दाखल
साईमत -फैजपूर – प्रतिनिधी |
फैजपूर पोलीस स्टेशन हद्दीत अवैधरित्या गावठी हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या दारू माफियांविरोधात पोलिसांनी आक्रमक पाऊल उचलले आहे. पोलिसांनी सलग दोन दिवस धडक मोहीम राबवून कासवा व पाडळसा शिवारात दोन मोठे छापे टाकले. या धडक कारवाईत हजारो रुपयांचे कच्चे रसायन, तयार गावठी दारू आणि हातभट्टीचे साहित्य जागीच नष्ट करण्यात आले असून, दोन्ही आरोपींविरोधात महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिली कारवाई: कासवा शिवारात तापी नदीपात्रात धाड
दि. १६ जुलै रोजी पहाटे ६:३० वाजेच्या सुमारास मौजे कासवा (ता. यावल) येथील तापी नदीपात्रात अवैध हातभट्टी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात दशरथ दिलीप सपकाळे (रा. कासवा) याच्या भट्टीवरून सुमारे ११ हजार ५०० रुपये किमतीचे ८०० लिटर गूळ, मोह व नवसागर मिश्रित कच्चे-पक्के रसायन आणि ७० लिटर तयार गावठी दारू नष्ट करण्यात आली. याप्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल विकास सोनवणे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरी कारवाई: पाडळसा येथील राजाभोये नाल्यात छापा
या कारवाईच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजेच दि. १७ जुलै रोजी सकाळी ६:०० वाजता पोलिसांनी दुसरी मोठी कारवाई केली. मौजे पाडळसा येथील राजाभोये नाल्यात अवैधरित्या दारू तयार करणाऱ्या गणेश रवींद्र कोळी (रा. पाडळसा) याच्या भट्टीवर छापा टाकण्यात आला. या कारवाईत ५ हजार रुपये किमतीचे ४०० लिटर रसायन आणि ३५ लिटर तयार गावठी दारू जप्त करून नष्ट करण्यात आली. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल मुक्कदर इब्राहिम तडवी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
”फैजपूर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध दारूची निर्मिती आणि विक्री कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही. अवैध धंदे चालवणाऱ्यांवर यापुढेही अशाच प्रकारच्या तीव्र कारवाया सातत्याने सुरू राहतील.”
— फैजपूर पोलीस प्रशासन
ही धडक कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, सहायक फौजदार संतोष चौधरी, मोती पवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल विकास सोनवणे आणि पोलीस कॉन्स्टेबल मुक्कदर तडवी यांच्या संयुक्त पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे परिसरातील अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.
