साईमत न्यूज नेटवर्क –
बह्राइच : उत्तर प्रदेशातील बह्राइच जिल्ह्यात घाघरा (सरयू) नदीकाठी घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. हात-पाय धुण्यासाठी नदीच्या काठावर गेलेल्या 12 वर्षीय मुलावर मगरीने अचानक हल्ला करून त्याला खोल पाण्यात खेचून नेले. या घटनेत मुलाचा मृत्यू झाला असून, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ही घटना गुरुवारी सायंकाळी बौंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुरौवा गावाजवळ घडली. सुनील सिंह हा आपल्या काकांसोबत शेतातील लागवडीचे काम करण्यासाठी गेला होता. काम संपल्यानंतर दोघेही घाघरा नदीच्या काठावर हात-पाय धुत असताना नदीतून अचानक एक मगर बाहेर आली आणि तिने सुनीलवर झडप घातली.
क्षणाचाही विलंब न करता मगरीने सुनीलला आपल्या जबड्यात पकडले आणि खोल पाण्याकडे ओढत नेले. मुलाने स्वतःची सुटका करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. त्याचे काका आणि आसपासचे ग्रामस्थ मदतीसाठी धावत आले. त्यांनी आरडाओरड केली, दगडफेक केली, मात्र मगरीने मुलाला सोडले नाही.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, मगरीने मुलाला अनेकदा पाण्यात आपटत खोल नदीत नेले आणि काही वेळातच तो नजरेआड झाला. त्यानंतर ग्रामस्थांनी बांबू, टॉर्च आणि इतर साधनांच्या मदतीने शोधमोहीम सुरू केली.
सुमारे पाच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर घटनास्थळापासून काहीशे मीटर अंतरावर रात्री उशिरा सुनीलचा अर्धवट मृतदेह नदीत तरंगताना आढळून आला. मगरीच्या हल्ल्यात त्याच्या शरीराचा खालचा भाग गंभीररीत्या विद्रूप झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
वन विभागाने या घटनेची पुष्टी करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आल्याची माहिती दिली. तसेच मृताच्या कुटुंबाला शासनाकडून आर्थिक मदत दिली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
सुनील सिंह हा चार भावंडांपैकी एक होता. काही वर्षांपूर्वी त्याच्या आई-वडिलांचे निधन झाले होते. त्यानंतर तो आपल्या काकांच्या देखरेखीखाली राहत होता. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
दरम्यान, घाघरा (सरयू) नदीतील पाण्याची पातळी वाढल्यामुळे या परिसरात मगरींचा वावर वाढल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे. यापूर्वीही अशा घटना घडल्या असून, नदीकाठच्या गावांमध्ये सुरक्षेच्या अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
