अंजनसोंडे एकता बहुउद्देशीय संस्थेचा पाठपुरावा फळाला; शिवप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण
साईमत -जळगाव- प्रतिनिधी |
भुसावळ तालुक्यातील अंजनसोंडे गावातील अंजनसोंडे एकता बहुउद्देशीय संस्था आणि समस्त ग्रामस्थांच्या अविरत प्रयत्नांना अखेर मोठे यश आले आहे. गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकृत मंजुरी दिली असून, प्रशासनाकडून परवानगीचा ‘हिरवा कंदील’ मिळाला आहे. या निर्णयामुळे संपूर्ण गावात आणि परिसरात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शिवरायांच्या पुतळा उभारणीसाठी ग्रामस्थांनी कायदेशीर मार्गाने सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे सादर केला होता. या प्रस्तावाची सखोल पडताळणी व आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी पुतळा उभारण्यास अधिकृत मंजुरी प्रदान केली. परवानगी मिळाल्याची बातमी समजताच शिवप्रेमींनी एकत्र येत आनंदोत्सव साजरा केला.
तरुण पिढीसाठी ठरेल प्रेरणास्थान
“छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, स्वराज्य संकल्पना आणि राष्ट्रप्रेमाचे विचार आजच्या तरुण पिढीपर्यंत पोहोचावेत, हा यामागील मुख्य उद्देश आहे. महाराजांचा दैदिप्यमान इतिहास आणि आदर्श डोळ्यांसमोर ठेवून भावी पिढीने वाटचाल करावी, यासाठी हा पुतळा गावात प्रेरणास्थान ठरेल,” असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
लवकरच या पुतळ्याच्या उभारणीचे काम प्रत्यक्ष सुरू होणार आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल अंजनसोंडे ग्रामस्थांनी आणि परिसरातील शिवप्रेमींनी जिल्हा प्रशासनाचे विशेष आभार मानले आहेत.
