‘ॲनिमल बर्थ कंट्रोल’ केंद्राची मागणी नगरसेविका यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
साईमत /यावल /प्रतिनिधी
यावल शहरात भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी गंभीर समस्या बनत असून या प्रश्नावर तातडीने प्रभावी उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी नगरपरिषद सदस्या कल्पना वाणी यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी यावल नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देत शहरात तातडीने ‘ॲनिमल बर्थ कंट्रोल (एबीसी) सेंटर’ सुरू करण्याची मागणी केली आहे.
मुख्याधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात शहरातील विविध भागांत भटक्या कुत्र्यांची संख्या सातत्याने वाढत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. रस्त्यांवर कुत्र्यांचे कळप मुक्तपणे फिरत असल्याने नागरिकांना दैनंदिन हालचाली करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः शाळकरी विद्यार्थी, लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी ही परिस्थिती अधिक धोकादायक ठरत असल्याचे निवेदनात अधोरेखित करण्यात आले आहे.
शहरात भटक्या कुत्र्यांकडून हल्ल्यांच्या घटना वाढत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक भागांत नागरिकांना सकाळी व रात्रीच्या वेळी रस्त्यावरून जाण्यासही धास्ती वाटत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होण्यापूर्वीच नगरपरिषद प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे कल्पना वाणी यांनी म्हटले आहे.
भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर कायमस्वरूपी आणि शास्त्रोक्त उपाय म्हणून यावल नगरपरिषदेच्या माध्यमातून ‘ॲनिमल बर्थ कंट्रोल’ केंद्र तातडीने कार्यान्वित करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. या केंद्राच्या माध्यमातून भटक्या कुत्र्यांची नसबंदी, रेबीज प्रतिबंधक लसीकरण तसेच शासनाच्या नियमांनुसार त्यांचे व्यवस्थापन करण्यात आल्यास कुत्र्यांची संख्या नियंत्रणात राहण्यास मदत होईल आणि नागरिकांच्या सुरक्षिततेची हमी अधिक बळकट होईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे.
यावल शहरातील वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या समस्येची तातडीने दखल घेऊन ‘ॲनिमल बर्थ कंट्रोल’ केंद्र सुरू करण्यासाठी आवश्यक प्रशासकीय कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी नगरसेविका कल्पना वाणी यांनी नगरपरिषद प्रशासनाकडे केली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या मागणीवर नगरपरिषद कोणती भूमिका घेते, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
