हम को मिटा सके ये जमाने में दम नहीं हमसे जमाना खुद है जमाने से हम नहीं
सुरेश उज्जैनवाल
….बरं झालं माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांनी स्वतःच भाजपमध्ये परत जाण्याची कोणतीही इच्छा नसल्याचे जाहीर करून विरोधकांना त्यांचे कडवट शब्दरूपी हल्ले तूर्त तरी म्यान करण्यास भाग पाडले आहे. पण असे असले तरी पुन्हा नवीन पिक्चर सुरू करणे तितकेसे सोपे नसते, अशी वक्तव्ये करणाऱ्यांना कदाचित माहीत नसावे की, नवीन पिक्चर केव्हाही सुरू करता येतो फक्त स्टोरी , पार्श्वभूमी दमदार हवी, आणि हेही शाश्वत सत्य आहे की प्रत्येकाचा पिक्चर कधी ना कधी संपतोच…!
हल्ली राजकीय क्षेत्रात एकमेकाला विशेषतः कट्टर विरोधकास नामोहरम करण्याची शर्यतच लागलेली दिसते. राजकारणातील कट्टर विरोधक म्हणजे शत्रू नव्हे, हे विधान लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत परिपक्व आणि सत्य आहे. राजकीय मतभेद आणि विचारसरणी वेगळी असू शकते किंबहुना ती वैचारिक, धोरणात्मक दृष्ट्या भिन्न असण्यात काहीही गैर नाही. परंतु याचा अर्थ विरोधकांना नष्ट करणे किंवा त्यांची खिल्ली उडवत व्यक्तीगत पातळीवर द्वेष करणे असा होत नाही.
आ. खडसेंचा वाढदिवस येत्या २ सप्टेंबरला आहे, त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी त्यांचा वाढदिवस अमृत महोत्सवी म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानिमित्त श्री. खडसे राज्यातील काही बड्या नेत्यांना भेटून कार्यक्रमाचे निमंत्रण देत आहेत. या भेटीगाठीचा वेगळाच अर्थ काढून काही अतिउत्साही राजकारण्यांनी त्यांची खिल्ली उडवत कडवट टीका टिप्पणी केल्याचे वृत्त आहे. तसं बघता श्री. खडसे यांचा राजकीय प्रवास चार दशकांचा राहिला आहे. त्यांनी शून्यातून आपले राजकीय नेतृत्व निर्माण केले, एवढेच नव्हे तर जळगाव जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण खानदेशात भाजपची शक्ती वाढविली. सुरुवातीच्या काळात त्यांना प्रतिस्पर्धी पक्षाशी प्रचंड संघर्ष करावा लागला. पण भाजपला राजकीय पक्ष म्हणून अव्वल स्थान निर्माण करण्यातील त्यांचे योगदान कोणीही नाकारू शकत नाही. वर्तमान स्थितीत ते राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार आहेत. गेल्या आठ, दहा वर्षांपासून ते सत्तेत नाहीत पण जिल्ह्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी ते आजही लोकमान्य नेता म्हणून कायम आहेत, अशी किंवा त्यांच्या इतकी जनमान्य राजकीय उंची त्यांची खिल्ली उडविणाऱ्या सत्याधाऱ्यांनाही नाही; अद्यापही साधता आलेली नाही. नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात त्यांनी जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न पोटतिडकेने मांडून काही प्रश्नात त्यांनी न्याय देण्यास सरकारला भाग पाडले आहे, हेही देखील सत्य आहे.
त्यांच्यावर द्वेषमूलक टीका करून त्यांची खिल्ली उडविणाऱ्यांनी सत्तेचा उपयोग कसा केला किंवा करीत आहे, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. श्री. खडसेंच्या प्रति द्वेषमूलक भावनेतून एक बाब स्पष्ट होते ती अशी की, खरंच ते सत्ताधारी पक्षात आले तर आपले काय होईल? या चिंतेने तर त्यांना ग्रासलेले नाही ना ? श्री. खडसे यांनी सत्ता किंवा पदासाठी कोणाची मिन्नतवारी केल्याचे दिसून येत नाही किंवा त्यांनी राजकारणात राज्यव्यापी जी उंची गाठली त्यात जळगाव जिल्ह्यातील जनता वगळता अन्य कोणाचे ही योगदान अथवा आशिर्वाद नव्हते व नाही, हे सत्यदेखील नाकारता येत नाही.
