पतीला जीवे मारण्याची दिली होती धमकी; दारू पाजून शेतात आवळला गळा
साईमत -रावेर- प्रतिनिधी |
पत्नीसोबत असलेल्या अनैतिक संबंधांना विरोध केल्याचा राग मनात धरून एका ३० वर्षीय तरुणाची गळा दाबून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना रावेर तालुक्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणातील फरार असलेल्या दोन्ही संशयित आरोपींना रावेर पोलीस आणि जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने अत्यंत शिताफीने अवघ्या २४ तासांच्या आत बेड्या ठोकल्या आहेत. न्यायालयाने आरोपींना १७ जुलैपर्यंत ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.शेख कुर्बान शेख शब्बीर (वय ३०, रा. ऐनपूर, ता. रावेर) असे खून झालेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा लहान भाऊ शेख सलमान शेख शब्बीर याने रावेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित मुख्य आरोपी गणेश विजय उर्फ संजय घोरपडे (वय २५, रा. भोर रेल्वे स्टेशन, रावेर) याचे मृत शेख कुर्बान याच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते. एप्रिल २०२६ मध्ये कुर्बान याच्या आईचे ऑपरेशन झाल्यामुळे संपूर्ण कुटुंब काही दिवसांसाठी भोर येथे मुक्कामी गेले होते. याच संधीचा फायदा घेऊन गणेश हा कुर्बानच्या ऐनपूर येथील घरी गेला होता. मात्र, ग्रामस्थांनी त्याला रंगेहात पकडून बेदम चोप दिला आणि गावातून हाकलून दिले होते.
या प्रकारानंतर मृत कुर्बान आणि त्याच्या आईने गणेशला जाब विचारला असता, त्याने उलट त्यांनाच शिवीगाळ करत, “तुमच्या पत्नीचे व माझे एकमेकांवर खूप प्रेम आहे, तू आमच्यामध्ये आलास तर तुला जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी दिली होती.
याच धमकीचा राग मनात धरून गणेश घोरपडे याने त्याचा मित्र मेघराज वसंत सांगळे (वय ३१, रा. भोर रेल्वे स्टेशन) याच्या मदतीने कुर्बानचा काटा काढण्याचा कट रचला. ९ जुलैच्या रात्री ते ११ जुलैच्या सकाळच्या दरम्यान, आरोपींनी कुर्बानला गाठून त्याला आधी दारू पाजली. त्यानंतर त्याला पूर्णपणे नशेत करून नांदुरखेडा शिवारातील विनायक काशिनाथ पाटील यांच्या शेतातील (गट नं. ९६) निर्जन ठिकाणी नेले. तेथे दोघांनी संगनमत करून कुर्बानचा गळा दाबून त्याचा खून केला व मृतदेह तिथेच टाकून फरार झाले.
पोलिसांची ‘ॲक्शन मोड’ अन् २४ तासांत अटक
या गंभीर गुन्ह्याची नोंद १२ जुलै रोजी पहाटे रावेर पोलीस ठाण्यात (गुन्हा रजि. नं. ३४३/२०२६, भा.न्या.सं. कलम १०३(१), ३(५)) झाल्यानंतर पोलिसांनी चक्र फिरवली.
जळगाव स्थानिक गुन्हे शाखा आणि रावेर पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने तात्काळ तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांच्या नेटवर्कचा वापर केला. संशयितांचा माग काढत २४ तासांच्या आत गणेश घोरपडे आणि मेघराज सांगळे या दोन्ही आरोपींना पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांना १२ जुलै रोजी रात्री अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना १७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली रावेरचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन, तुषार पाटील, पोहेकॉ नितीन आमोदकर, विजय चौधरी, रुबाब तडवी, सुकेश तडवी, विशाल पाटील, प्रमोद पाटील आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कौतुकास्पद कामगिरी केली.
