भक्ती, प्रेम आणि सेवाभावाचा संदेश देणारी जगन्नाथ रथयात्रा भाविकांना सहभागी होण्याचे आवाहन
साईमत /पाचोरा /प्रतिनिधी
भगवान श्रीजगन्नाथांच्या रथयात्रेचा आध्यात्मिक संदेश आणि भक्तीमार्गाचे महत्त्व उलगडून सांगणारा साप्ताहिक भगवद्गीता सत्संग येथील श्री श्री इस्कॉन जगन्नाथ मंदिरात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. रविवारी (दि. १२ जुलै) सायंकाळी आयोजित या कार्यक्रमाला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत भक्तीभावाने सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाची सुरुवात हरिनाम संकीर्तनाने झाली. महामंत्राच्या गजराने मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. यानंतर प्रमुख वक्ते चैतन्य जीवन प्रभुजी यांनी भगवान श्रीजगन्नाथांच्या रथयात्रेचे महत्त्व, श्रीकृष्णभक्तीचा मार्ग आणि भगवद्गीतेतील भक्तियोग या विषयांवर प्रभावी मार्गदर्शन केले.
यावेळी प्रभुजी यांनी सांगितले की, भगवान श्रीजगन्नाथ, बलभद्र आणि माता सुभद्रा हे आपल्या भक्तांशी प्रेमाचे नाते दृढ करण्यासाठी रथावर आरूढ होऊन नगरभ्रमण करतात. रथयात्रा ही केवळ परंपरा किंवा उत्सव नसून ती भक्त आणि भगवान यांच्यातील प्रेम, विश्वास आणि समर्पणाचे प्रतीक आहे. या दिव्य सोहळ्याच्या माध्यमातून प्रत्येकाने आपल्या जीवनात सत्य, सेवा, नम्रता आणि सदाचाराचा स्वीकार करावा, असा संदेश मिळतो.
भक्ती ही केवळ धार्मिक आचरणापुरती मर्यादित नसून ती जीवन जगण्याची शुद्ध आणि सकारात्मक पद्धत आहे. श्रद्धा, नामस्मरण आणि निस्वार्थ भावनेने भगवानाचे चिंतन केल्यास मन:शांती आणि आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग खुला होतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
रथयात्रा माणसाला अहंकार, द्वेष आणि नकारात्मक विचारांपासून दूर नेऊन प्रेम, करुणा आणि सेवाभावाची शिकवण देते. भगवानाच्या चरणी स्वतःला समर्पित करून सद्विचारांनी जीवन जगणे हाच खरा भक्तीचा अर्थ असल्याचे प्रभुजी यांनी सांगितले.
यावेळी रविवार (दि. १९ जुलै) रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या भगवान श्रीजगन्नाथांच्या भव्य रथयात्रेत भाविकांनी कुटुंबासह मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मंदिर व्यवस्थापनाच्या वतीने करण्यात आले.
सत्संगाच्या समारोपानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. “हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम हरे राम राम राम हरे हरे” या महामंत्राच्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. अध्यात्म, भक्ती आणि सकारात्मक विचारांचा संदेश देणारा हा सत्संग भाविकांसाठी संस्मरणीय ठरला.
