फ्युज बॉक्समधून उडाल्या ठिणग्या; परिसरात काही काळ भीतीचे वातावरण
साईमत -जळगाव- प्रतिनिधी |
शहरातील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळील बॉम्बे बेकरीसमोरील विद्युत डीपीच्या फ्युज बॉक्सला रविवारी रात्री सुमारे १० वाजता अचानक भीषण आग लागली. पेट्रोल पंपाच्या अगदी जवळ ही घटना घडल्यामुळे परिसरात काही काळ प्रचंड भीतीचे आणि घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, अग्निशमन दलाने दाखवलेल्या कमालीच्या तत्परतेमुळे एक मोठा आणि भयानक अनर्थ टळला आहे.
एक्स्टिंग्विशर आणि पाण्याचा मारा
विद्युत डीपीला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक कुठलाही वेळ न दवडता तातडीने घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पोहोचले तेव्हा फ्युज बॉक्समधून मोठ्या प्रमाणावर ठिणग्या आणि विद्युत फटाके उडत होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जवानांनी सर्वप्रथम दोन फायर एक्स्टिंग्विशरच्या (अग्निशामक नळकांडी) सहाय्याने आगीची तीव्रता कमी केली. त्यानंतर तात्काळ वीजपुरवठा खंडित करण्यात आला आणि पाण्याचा मारा करून आग पूर्णपणे आटोक्यात आणली.
हा पेट्रोल पंप परिसर असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले असते तर मोठी दुर्घटना घडू शकली असती. परंतु, अग्निशमन दलाचे वाहन चालक देविदास सुरवाडे, फायरमन रोहिदास चौधरी, नवल शंकरपाळ आणि विकी सोनवणे यांनी जीवाची पर्वा न करता अत्यंत धाडसाने आणि कौशल्याने ही आग विझवली.
सुदैवाने जीवितहानी नाही: अग्निशमन दलाच्या या वेळेवर आणि धाडसी कारवाईमुळे या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, तसेच मोठे आर्थिक नुकसानही टळले. वेळेवर मिळालेल्या प्रतिसादामुळे जळगावकरांनी सुटकेचा श्वास सोडला असून अग्निशमन दलाच्या जवानांचे कौतुक होत आहे.
